पाढे म्हणणे म्हणजे लहान मुलांसाठी एकप्रकारे शिक्षाच असते. शाळेत शिक्षक आणि घरी आईवडिल ओरडल्यामुळे मुलांना कसेबसे १० पर्यंतचे पाढे येतात. मात्र अनेकांना त्यापुढचे पाढे काही केल्या पाठ होत नाहीत आणि मग आयुष्यभर गणित कच्चेच राहते. पण याला अपवाद आहे. उत्तरप्रदेशमधील सहारनपूर येथे राहणाऱ्या एका आठवीतल्या मुलाला एक, दोन नाही तर तब्बल २० कोटींपर्यंतचे पाढे म्हणता येतात. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या मुलाचे नाव आहे चिराग नरेंद्र सिंह असून तो सध्या आठवीमध्ये शिकत आहे.

चिरागने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत आपली चुणूक दाखवून दिली आहे. आपल्याला मोठेपणी शास्त्रज्ञ व्हायचे असून देशाचे नाव उज्ज्वल करायचे असल्याचे चिराग सांगतो. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्याची आपली इच्छा असल्याचेही त्याने सांगितले. आमची आर्थिक परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नसली तरीही चिरागकडे जन्मत: असलेली बुद्धीमत्ता वाया जाणार नाही याची आम्ही विशेष काळजी घेऊ असे त्याच्या वडिलांनी सांगितले. याआधी हिमाचल प्रदेशमधील एक मुलगा ११०० पर्यंतचे पाढे म्हणू शकतो असे समोर आले होते. तर छत्तीसगडमधील एका पहिलीच्या मुलाला ३० पर्यंतचे पाढे तोंडपाठ असल्याचे समोर आले होते.

आता भारतीय मुलांकडे इतकी बुद्धीमत्ता असली तरीही अपुऱ्या सुविधेअभावी ते मागे राहत असल्याचे दिसते. अनेकदा मुलांना शाळेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पोषक आहार आणि शिक्षण योग्यपद्धतीने मिळत नसल्याने त्यांचा म्हणावा तसा विकास होत नाही. याबाबतच्या बातम्या सातत्याने आपल्यासमोर येत असतात. त्यामुळे शालेय शिक्षणाबाबत राज्य आणि केंद्र सरकारने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.