कागदपत्रांवरील शब्द न् शब्द वाचूनच निर्णय घ्यावा असं आधीच्या काळी म्हटलं जायचं. अनेकदा आजही असे सल्ले वयाने मोठी माणसे देत असतात. हाच सल्ला जर दनियल खान याला कोणीतरी दिला असता तर त्याचा १६ तासांचा चुकीच्या कॉलेजच्या दिशेने झालेला प्रवास टाळता आला असता.

झालं असं की दनियलला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) कडून कॉलेजमधून अॅडमिशन घेण्याचे पत्र आले. पदव्युत्तर शिक्षणासाठी इतक्या मोठ्या संस्थेकडून पत्र आल्याने तो भलताच खूष झाला. त्याने आणि त्याच्या वडिलांनी लगेच कॉलेजला जाऊन अॅडमिशन घेण्याचा निर्णय घेतला. ही ट्रीप मेमोरेबल करण्यासाठी त्यांनी आपल्या गाडीने जाण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे महाराष्ट्रातून तेलंगणमार्गे ते सर्टिफिकेटवर देण्यात आलेल्या ‘ए. प्रदेश’ या पत्त्यानुसार आंध्रप्रदेशात दाखल झाले. पण तेथील एनआयटीने ते पत्र पाठवलेच नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ते पत्र पूर्ण वाचल्यावर आपल्याला आंध्रप्रदेशच्या नाही तर अरुणाचल प्रदेशमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून अॅडमिशनचे पत्र आल्याचे दनियलला समजले. याबद्दल दनियलने रेडईटवर शेअर केलेल्या किश्शामध्ये तो सांगतो, आम्ही चक्क ९३० किलोमीटर प्रवास करुन पोहोचलो. या प्रवासात आम्ही मज्जा केली मात्र प्रवासाचा हेतूच साध्य झाला नाही. तिथे गेल्यावर ते एपी म्हणजे आंध्रप्रदेश नसून अरुणाचल प्रदेश असल्याचे समजले आणि आम्हीच आमची फजिती करुन घेतल्यासारखे झाले.