केवळ सर्च आणि बातम्यांद्वारे गुगलने मागील वर्षी म्हणजे 2018 मध्ये तब्बल 4.7 अब्ज डॉलर अर्थात जवळपास 32,900 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही कमाई कंपनीने Google News आणि Google Search च्या माध्यमातून केली आहे. गुगलने माध्यम समूहांच्या ऑनलाईन जाहिरातींचा मोठा भाग स्वत:कडे ओढून घेतला आहे. त्यामुळे अनेक माध्यम समूहांच्या उत्पादनात घट झाली आहे.

विशेष म्हणजे अमेरिकेतील सर्व माध्यम समूहांचा डिजिटल जाहिरातींद्वारे मिळालेला एकत्रित महसूल 5.1 अब्ज डॉलर आहे. गुगलने मिळविलेला महसूल जवळपास एवढाच आहे. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे या महसुलात गुगलकडून गोळा करण्यात येणाऱ्या ग्राहकांच्या वैयक्तिक डाटाचे मूल्य गृहीत धरलेले नाही. प्रत्येक ग्राहकाच्या क्लिकच्या माध्यमातून हा डाटा गुगलला मिळतो.

न्यूज मीडिया अलायंसच्या (एनएमए) एका रिपोर्टमध्ये याबाबत माहिती जाहीर करण्यात आली आहे. अमेरिकेतील सुमारे 2 हजार वृत्तपत्रांचे ही संस्था प्रतिनिधित्व करते. गुगल बातम्यांचा जो मजकूर वापरते त्यासाठी काहीही खर्च करीत नाही. जगभरातील माध्यम समूहांच्या हेडलाइन्स गुगलकडून जशास तशा वापरल्या जातात. त्यामुळे गुगलच्या या कमाईचा काही भाग ज्या पत्रकारांनी बातम्यांच्या मजकुरासाठी (लेख आणि व्हीडिओ) मेहनत घेतलीये त्यांना द्यायला हवा, कारण गुगल बातम्यांचा जो मजकूर वापरते त्यासाठी ती काहीही खर्च करीत नाही, अशी भूमिका न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ‘एनएमए’चे अध्यक्ष डेव्हिड शेवर्न यांनी मांडली आहे.