मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. बुधवारी पहाटेपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत दाणादाण उडवली. सखल भाग, रस्ते, रेल्वेमार्ग जलमय झाले आहेत. मुंबईमधील मुसळधार पाऊसाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामध्येच एक खास फोटो व्हायरल होत असून यामध्ये धो धो पडणाऱ्या पावसामध्ये मुंबई पोलीस दलातील वाहतूक पोलीस ऑन ड्युटी असल्याचे दिसत आहे. राष्ट्रावादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हा फोटो ट्विटरवरुन शेअर करत पोलिसांचे आभार मानले आहेत.

मुसळधार सरी, सोसाटय़ाचा वारा आणि त्यामुळे समुद्राला आलेले उधाण असे तिहेरी संकट एकाच वेळी आल्याने अवघे शहर जलमय झाले. लॉकडाउनमधून मुक्त झाल्याच्या दिवशीच पावसाने मुंबईकरांना जखडून ठेवले. नदी, नाल्यांना आलेला पूर पाहून मुंबईकरांच्या मनातील ‘२६ जुलै’च्या भीतीदायक आठवणी ताज्या झाल्या. जून आणि जुलैमध्ये लपंडाव खेळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रीपासून मुंबईत दमदार हजेरी लावली आहे. मात्र, बुधवारी त्याचा नूरच वेगळा होता. पहाटेपासूनच वादळीवारे घोंघावू लागले आणि त्यासोबत आलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई काही वेळेतच जलमय झाली. कधी नव्हे ते दक्षिण मुंबईमधील नरिमन पॉइंट, चर्चगेट, मरिन ड्राइव्ह, गिरगाव आदी ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले. मरिन ड्राइव्ह समुद्रकिनाऱ्यावर रौद्ररूपी लाटा धडकू लागल्या. कधी नव्हे ते गिरगाव चौपाटीलगतच्या सुभाषचंद्र बोस मार्गावर प्रचंड पाणी साचले. ग्रॅन्ट रोड, क्रॉफर्ड मार्केट, मुंबई सेंट्रल, सातरस्ता, लालबाग, परळ, हिंदमाता, दादर, माहीम, चेंबूर, कुर्ला, घाटकोपर, भांडूप, चुनाभाट्टी, मानखुर्द यांसह विविध परिसर जलमय झाले. उपनगरांतील नदी आणि नाले दुथडी भरून वाहू लागले. नाल्याच्या काठावर उभ्या असलेल्या झोपडय़ांमधील रहिवाशांचा पावसाचा रुद्रावतार पाहून थरकाप उडाला. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आणि मोठे नुकसान झाले. जलमय झालेल्या रस्त्यांवरील उभ्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले. चर्चगेट, नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह यांसह ठिकठिकाणचे मोठे वृक्ष उन्मळून पडले.

मात्र या अशा परिस्थितीमध्येही मुंबई पोलीस ऑन ड्युटी होते. त्यांच्या याच जिद्दीची झलक दाखवणारा एक फोटो व्हायरल होत आहे. पिवळ्या रंगाचा रेनकोट घालून रस्त्यावरील वाहनांवर लक्ष ठेवणाऱ्या मुंबई पोलीस दलातील एका जवानाचा पाठमोरा फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर हजारोच्या संख्येने शेअर केला जात आहे. पावसामध्येही आम्ही तुमच्यासाठी काम कर आहोत असा विश्वास या फोटोच्या माध्यमातून व्यक्त केला जात असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. सुप्रिया सुळे यांनीही हा फोटो ट्विट करत मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. “आपली मुंबई सुरक्षित आहे ही मुंबई पोलीस तुम्ही बजावत असलेल्या कर्तव्यामुळेच… तुमच्या या मानवी मूल्ये जपणाऱ्या सेवाभावास सॅल्यूट…” अशा कॅप्शनसहीत सुप्रिया यांनी मुंबई पोलिसांना टॅग करुन हा फोटो ट्विट केला आहे.

नक्की पाहा >> “आयुष्यात पहिल्यांदाच पाहतोय,” दक्षिण मुंबईत साचलेलं पावसाचं पाणी पाहून शरद पवार आश्चर्यचकित

यशवंतराव चव्हाण सेंटरमधून घरी जात असताना सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाइव्ह केलं होतं. यामध्येही त्यांनी समुद्रात आल्यासारखंच वाटत आहे म्हटल्याचं दिसत आहे. तर या प्रवासामध्ये त्यांच्यासोबत असणारे त्यांचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही दक्षिण मुंबईमध्ये पहिल्यांदाच एवढं पाणी तुंबल्याचं बघत असल्याचं म्हटलं आहे.