भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अनेकांच्या ट्विटला प्रतिसाद देत त्यांना शक्य तितकी मदत केली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांच्याच मदतीमुळे एक लग्न सुरळीत पार पडले. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. अमेरिकेत असलेल्या एका विधवा महिलेला आणि तिच्या नवजात बालकाला भारतात सुखरुप परत आणण्यासाठी स्वराज यांनी मदत केली आहे. दीपिका पांडे ही महिला सध्या अमेरिकेत राहत आहे. तिला ४ वर्षांचा एका मुलगा असून या महिलेने नुकत्याच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. परंतु याचवर्षी करवा चौथच्या दिवशी या महिलेच्या नव-याचा हार्ट अटॅकमुळे दुर्दैवी मृत्यू झाला. नव-याच्या अकाळी झालेल्या मृत्यूमुळे पांडे कुटुंबियांच्या डोक्यावरचे छत्र हरवले अशातच त्यांच्या एका नातेवाईकांनी दीपिका पांडे ही गर्भवती असल्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. पण उपचारांसाठी या कुटुंबियांकडे पैशांची कमतरता होती त्यामुळे वैद्यकिय उपचार घेण्यासाठी या महिलेला अनेक समस्यांना समोरे जावे लागत होते.

दीपिका यांच्या बहिणीने अखेर सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली. आपल्या बहिणीची माहिती पत्राद्वारे त्यांनी स्वराज यांच्यापर्यंत पोहचवली. त्यावेळीस त्वरीत स्वराज यांच्याकडून उत्तर आले नाही पण हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्वराज यांनी या पत्राची दखल घेत अमेरिकेत अडकलेल्या पांडे कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली. भारतात येण्यासाठी या कुटुंबियाला व्हिसा मिळत नाही तोपर्यंत भारतीय दूतावासाला या कुटुंबाची काळजी घेण्यासाठीही सांगण्यात आले आहे. स्वराज यांनी यापूर्वीही अनेकांची मदत केली आहे. नुकतेच राजस्थान येथे राहणा-या नरेश तिवानी या तरूणाच्या पाकिस्तानी पत्नीला देखील भारताचा व्हिसा त्यांनी मिळवून दिला होता. स्वराज यांच्यामुळे त्यांचे लग्न र्निविघ्नपणे पार पडले.