“मुलांनो चला लवकर या सा-या जगाला Good Bye बोला, तुमची निघण्याची वेळ झालीय” वडिलांनी आपल्या जुळ्या मुलांना कुशीत घेऊन शेवटचं सांगितलं. पण बाबांचा आवाज ऐकण्यासाठी ती जिवंत नव्हतीच. या पापी जगाचा कायमचा निरोप घेऊन ती कायमची देवाघरी निघून गेली होती. ज्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्यांचे मृतदेह हातात दोऊन तो बाप फक्त डोळे भरून त्यांच्याकडे शेवटचं पाहत होता. ती आता कधीच उठणार नव्हती हे त्या दुर्भागी बापाला माहिती होतं, पण मन काही मानायला तयार नव्हतं. आपल्या दोन्ही मुलांच्या आठवणीत या बापाला आता आयुष्य काढायचं होत, म्हणूनच त्यांना घरापासून दफनभूमीपर्यंत नेताना शेवटची आठवण म्हणून या वडिलांनी एक व्हिडिओ काढून ठेवला. ही दुर्दैवी घटना आहे ती सिरियाची.

सततचे नागरी युद्ध आणि रोज किड्या मुंग्यांसारखी मारली जाणारी सामान्य जनता. आता या बातम्या ऐकून जगही विटले असेल. तिथे काय सुरूय याची कोणलाच पडली नाही. सीरियात लढाऊ विमानांनी विषारी वायूच्या मदतीने इडलिब प्रांतातील खान शेईखून शहरात हल्ला केला. या हल्ल्यात ७० हून अधिक जण ठार झाले असून त्यात सर्वाधिक मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यात अब्देल हमीद अलयुसूने आपले सारे कुटुंब गमावले. अब्देलला आया आणि अहमत ही नऊ महिन्यांची जुळी मुलं होती. त्या दिवशी झालेल्या विषारी वायुच्या हल्ल्यात अब्देलने आपले आई- वडिल, भावंडं त्यांचे कुटुंब सारे काही गमावले. आपली पत्नी आणि नऊ महिन्यांच्या या छोट्या मुलांना कसाबसा वाचवून तो सुरक्षित स्थळी घेऊन आला. या तिघांना औषध दिले तर ते नक्की वाचतील एवढीच आशा त्याला होती. पण नियतीला हे मान्य नव्हतं. आपल्या पत्नी आणि दोन्ही मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवून तो इतर कुटुंबियांना शोधण्यासाठी निघून गेला. पण जेव्हा परत आला तेव्हा त्याची दोन्ही निरागस मुलं आणि पत्नी हे जग सोडून गेले होते. आपल्या दोन्ही मुलांना शेवटच मिठीत घेऊन अब्देल दफनभूमीपर्यंत निघाला. “मुलांनो चला लवकर, या सा-या जगाला Good Bye बोला, तुमची निघण्याची वेळ झालीय” हे शेवटचं वाक्य बोलून त्याने मुलांना निरोप दिला.