महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो लोकांचा बळी गेला आहे तर अनेकजण बेपत्ता आहेत. लाखो लोकांचे संसार पाण्यात वाहून गेले. या महापुरात कर्नाटकमधील एका तहसिलदाराची माणूसकी पाहायला मिळाली आहे. गणपती शास्त्री असे या तहसिलदाराचे नाव आहे.

गणपती शास्त्री यांनी पद, प्रतिष्ठा विसरू चक्‍क आपल्या डोक्‍यावर तांदळाचे पोते घेवून पूरग्रस्तांपर्यंत पोहचवले आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्नाटकच्या दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील बेल्थानगडी तालुक्‍यातील हा व्हिडीओ आहे. गणपती शास्त्री येथील तहसिलदार आहेत. महापूरामुळे अनेकजण बेघर झाले आहेत. पूरग्रस्त लोकांसाठी मदत पोहचवण्यासाठी अनेक हात सरसावले आहे.

पूरग्रस्त आलेल्या भागात एका तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या पुलावरुन गणपती शास्त्री मार्ग काढत गावातील लोकांना अन्नधान्य घेऊन जाताना व्हिडीओत दिसत आहेत. त्यांच्या या कामामुळे इथल्या पूरग्रस्तांनी त्यांचे आभार तर मानले आहेत पण त्यांच्याकडे पाहूण पुन्हा एकदा नव्या जोमाने उभं राहणार असल्याचे प्रतिक्रिया दिली आहे. गणपती शास्त्री यांच्या कर्तव्यदक्ष कामगिरीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. नेटकरी त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव टाकत आहेत.