चोरीचा आरोप आणि त्यानंतर होणारी चौकशी प्रक्रिया हे तितके नवीन नाही. यामध्ये चोराने कबूली दिली तर पुढील गोष्टींचा काही प्रश्नच येत नाही. त्याला चोरीची कबूली द्यायला लावणे आणि मग ठरलेली शिक्षा देणे हे अतिशय सामान्य आहे. पण तैवानमध्ये एक अतिशय अजब घटना घडली आहे. एका महिला विद्यार्थिनीने आपल्या फ्रीजमधील दही चोरल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर दही चोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी फिंगर प्रिंटपासून डीएनए चाचणीपर्यंत अनेक गोष्टी कराव्या लागल्या. विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका महिलेचे दही चोरीला गेले होते. तिने याबाबत आपल्या सोबत राहणाऱ्या पाच जणांकडे याबाबतची चौकशीही केली. मात्र त्या सगळ्यांनी आपण दही घेतले नसल्याचे सांगितले.

आपले दही चोरल्याचा राग आलेली ही महिला पोलिस ठाण्यात गेली आणि तिने याबाबतची तक्रार केली. या दह्याची भारतीय चलनानुसार किंमत १३७ रुपये होती. इतक्या छोट्या गोष्टीसाठी तक्रार केल्यामुळे लोकांनी या महिलेला वेड्यात काढले. पोलिसांनी या महिलेची तक्रार दाखल करुन घेतली आणि तपास करायला सुरुवात केली. सामान्य तपासात काहीही न सापडल्याने महिलेने दुसऱ्या मार्गाने चौकशी करण्यास सांगितले. तेव्हा पोलिसांनी या ६ जणांची डीएनए चाचणी करायचे ठरवले. विशेष म्हणजे या चाचणीतून दह्याचा नेमका चोर सापडला. आता डीएनए चाचणी म्हटल्यावर खर्च तर येणारच. सहा लोकांची चाचणी करण्यासाठी ४२ हजार रुपये खर्च आला. चोरीच्या दह्याची किंमत आणि चोर पकडण्यासाठी खर्च करण्यात आलेली रक्कम यातील तफावत आश्चर्यकारक होती.