आपल्या आवडत्या पदार्थांचे नाव ऐकून तोंडाला पाणी न सुटणारे खूपच कमी लोकं सापडतील. मात्र तैवानमध्ये आवडत्या पदार्थावरुन असं काही घडलं की अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. येथील एका रुग्णालयामध्ये एक १८ वर्षीय तरुण ६२ दिवसांपासून कोमामध्ये होता. मात्र चिकन असा शब्द ऐकताच त्याला शुद्ध आली. ६२ दिवसांंपासून चियू नावाचा हा तरुण कोमात होता. मात्र चिकन फिलेट हे शब्द ऐकल्यानंतर तो कोमातून बाहेर आला आणि हे सर्व पाहून त्याच्या कुटुंबियांबरोबरच डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
तैवान न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार चियू नावाचा तरुण रस्ते अपघातामध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याला अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या तसेच अंतर्गत रक्तस्त्रावही झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत चियूला टॉन येन जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार केले. मात्र उपचारादरम्यान तो कोमात गेला. मागील दोन महिन्यांपासूनच तो कोमातच होता.
चियूच्या कुटुंबियांकडून तो कोमामधून बाहेर यावा, त्याला बरं वाटवं, त्याला शुद्ध यावी यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. अगदी औषधोपचारांपासून प्रार्थनांपर्यंत अनेक उपाय या तरुणाच्या कुटुंबियांनी करुन पाहिली. मात्र कसलाही परिणाम होत नव्हता. एक दिवस नेहमीप्रमाणे चियूचा मोठा भाऊ रुग्णालयामध्ये त्याच्या बाजूला बसून त्याच्याशी गप्पा मारताना भावूक होऊन त्याला आवडणाऱ्या गोष्टींबद्दल आणि तो बरा झाल्यानंतर काय काय करायचं याबद्दल बोलत होता. त्यावेळी तो “मी तुला आवडणारे चिकन फिलेट खायला जाऊ,” असं म्हणाला. हे ऐकताच चियूची नाडीच्या ठोक्यांची गती वाढली. चियूच्या भावाने लगेच तेथील नर्सला आवाज दिला. त्यानंतर डॉक्टरही तेथे आले. चियू शुद्धीवर आल्याचे डॉक्टरांनी त्याच्या भावाला सांगितले.
18-year-old miraculously awakens from 62-day coma after hearing his favorite dish: ‘chicken fillet’ https://t.co/ZZU0LE2qFb pic.twitter.com/UvWU0euqp4
— Taiwan News (@TaiwanNews886) November 5, 2020
शुद्धीवर आल्यानंतर काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवल्यानंतर आणि औषधे लिहून दिल्यानंतर चियूला डिस्चार्ज देण्यात आला. सध्या इंटरनेटवरही या बातमीची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2020 12:40 pm