फिलिपिन्समध्ये पर्यटनासाठी आलेल्या तैवानमधील एका तरुणीला विचित्र कारणासाठी ४० पौंडचा ( अंदाजे ३ हजार ६०० रुपये) दंड करण्यात आला आहे. या तरुणीने समुद्रकिनाऱ्यावर फिरताना घातलेली थाँग बिकीनी अगदीच नाजूक होती असं सांगत तिला हा दंड ठोठावण्यात आला आहे. या तरुणाची बिकीनी म्हणजे अगदी एखादा दोरा घातल्याप्रमाणे वाटत होता असं स्थानिक प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लीन त्झू टिंग ही २६ वर्षीय तरुणी आपल्या प्रियकराबरोबर बिकीनी बोरके बेटावरील घालून समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेली होती. मात्र तिने घातलेल्या बिकीनीवर तेथील इतर पर्यटकांनी आणि स्थानिकांनी आक्षेप नोंदवला आणि यासंदर्भात फोन करुन पोलिसांना माहिती दिली. समुद्रकिनाऱ्यावर ही आक्षेपार्ह बिकीनी घालून फिरणाऱ्या लीनचे फोटो अनेकांनी सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केले. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेत. फोटोंच्या आधारे हॉटेलमधून लीन आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. लीनवर पोलिसांनी कोणता गुन्हा दाखल केला आहे याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. मात्र फिलिपिन्समध्ये सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता परसवण्यासंदर्भात असलेल्या कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.

घडलेल्या या प्रकाराबद्दल स्थानिक पोलीस खात्यातील मले पोलीस स्थानकाचे अधिकारी जेस बायलोन यांनी अधिक माहिती दिली. ‘दोन दिवसांपासून या तरुणीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्याचे पहायला मिळाले. तिने घातलेल्या कपड्यांवर अनेकांनी आक्षेप नोंदवला. खरोखरच ती एका दोरी एवढीच थाँग बिकीनी घातली होती. आमच्या देशातील संस्कृतीमध्ये असे कपडे घालणे मान्य नाही,’ असं बायलोन म्हणाले.

या बेटावर बिकीनी घालून जाण्याला परवानगी नाही हे मला ठाऊक नव्हते, तसेच ती कपडे घालणे हा माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे असं लीन हिने पोलिसांनी दिलेल्या जबाबामध्ये म्हटले आहे. ११ जानेवारील बेटावरुन स्वदेशी परतण्याआधी लीनला ४० पौंडचा दंड भरणे बंधनकारक आहे. या प्रकरणानंतर पर्यटकांनी स्थानिक संस्कृतीचा अपमान होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.