वेळेचं महत्त्व काय असतं हे जपानी लोकांकडून शिकावं. जपानी लोक हे वक्तशीर म्हणून ओळखले जातात. त्यांचं आयुष्य घडाळ्याच्या काट्यावर धावतं. ठरलेल्या वेळेपेक्षा काही सेकंद जरी उशीर झाला तरी जापानी माफी मागायला विसरत नाही. तर अशा जपानमध्ये एखाद्या कर्मचाऱ्यानं वेळ पाळली नाही म्हणून त्याला शिक्षा झाली तर नवल वाटायला नको. जपानमधल्या एका कंपनीनं कर्मचारी ३ मिनिटं लवकर जेवायला गेला म्हणून त्याचा अर्ध्या दिवसाचा पगार कापला आहे.

जपानमधल्या वॉटरवर्क ब्यूरो येथे हा कर्मचारी काम करतो. गेल्या सात महिन्यात तो जवळपास २६ वेळा वेळेच्या आधी जेवायला गेला म्हणून त्याचा पगार कापण्यात आला आहे. या कंपनीत दुपारच्या जेवणाची वेळ ही १ वाजताची आहे. पण हा कर्मचारी वेळेआधी जेवायला जातो त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. इतकंच नाही तर यासाठी सर्वांसमोर त्याला माफीही मागावी लागली. या कंपनीनं काही दिवसांपूर्वी एका कर्मचाऱ्याला कंपनीतून काढून टाकलं होतं. एकूण ५५ तास कमी भरले तसेच कामाच्या वेळेत तो जेवण आणण्यासाठी ऑफिसमधून बाहेर जायचा या कारणामुळे त्याला काढून टाकण्यात आलं होतं. सध्या याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. ३ मिनिटांसाठी एखाद्याचा पगार कापणं योग्य की आयोग्य यावरून आता वाद सुरू आहे.