‘इडली अम्मा’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या तामीळनाडूमधील आजीबाई पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. गोरगरिबांना अवघ्या एक रुपयात इडली विकणाऱ्या या आजींना आता हक्काचं घर भेटणार आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.

कमलाथल असं या आजीबाईंचं नाव असून परिसरात त्यांना इडली अम्मा नावाने ओळखलं जातं. आपल्या मोडक्या घरातच, चुलीवर इडली बनवण्याचे काम त्या जवळपास 30 वर्षांपासून करतात. अगदी लॉकडाउनमध्येही त्यांनी आपल्या कामात खंड पडू दिला नव्हता, त्यावेळी त्यांच्या या सामाजिक कार्याने सर्वांनाच प्रभावित केले होते. आता अखेर त्यांना स्वतःचं हक्काचं घर मिळणार आहे.

साधारण दोन वर्षांपूर्वी आनंद महिंद्रांनी या आजीबाईंच्या व्यवसायात गुंतवणूक करायची आहे, असं म्हटलं होतं. त्यानंतर गोरगरिबांना अवघ्या एक रुपयात इडली विकणाऱ्या या आजीबाईंची गोष्ट सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली. २०१९ साली केलेल्या आपल्या ट्विटमध्ये या आजीबाईंना एक एलपीजी कनेक्शन देणार, असंही महिंद्रांनी म्हटलं होतं.

आनंद महिंद्रांच्या एलपीजी कनेक्शनच्या ट्विटनंर कोइंबतूरच्या भारत गॅसने आजींना मोफत एलपीजी कनेक्शन भेट दिलं. त्याबाबत महिंद्रांनी कंपनीचे आभारही मानले होते. तर, आता आनंद महिंद्रा यांनी अम्माला व्यवसाय चालवण्यासाठी हात दिला आहे. महिंद्रा उद्योग समूहाने अम्माच्या नावावर जमीन घेतली आहे. थोंडमुथुरच्या कार्यालयात जागेची नोंदणी नुकतीच झाली. लवकरच त्या जागेवर घर बांधण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती महिंद्रा यांनी ट्विटरद्वारे दिली. सोबतच फोटोही शेअर केले. लवकरच त्यांना स्वतःचे घर आणि कार्यस्थान मिळेल, तिथेच स्वयंपाक करुन त्या इडलीची विक्री करतील असं महिंद्रांनी सांगितलं. महिंद्रा समूहाची रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट शाखा महिंद्रा लाइफस्पेस लवकरच अम्माच्या घराचं काम सुरू करणार आहे.


दरम्यान, गोरगरिबांना आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांनाही पोटभर खाता यावं यासाठी फक्त एक रुपयात इडली विकते, असं अम्मांनी २०१९ मध्ये माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.