नशिबात असतं तेवढचं सर्वांना मिळतं असं म्हटलं जातं. मात्र आपलं नशिबचं वाईट आहे म्हणून अनेकजण कायम रडत असतात. तर काहीजणांना अगदी क्षणात भरभरुन मिळतं. असंच काहीसं झालं टांझानियामधील एका खाण मालकाबरोबरच. या व्यक्तीच्या मालकीच्या खाणीमध्ये अशी काही गोष्ट सापडली की तो रातोरात करोडपती झाला. या व्यक्तीच्या मालकीच्या खाणीमध्ये दोन अनमोल रत्नं मिळाली. बरं ही रत्नं त्याने सरकारच्या ताब्यात दिल्याच्या मोबदल्यात त्याला ७.७४ बिलीयन टांझानियन शिलिंग म्हणजेच २५ कोटी ३६ लाख रुपये देण्यात आल्याचे वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे.

केवळ याच भागात सापडतात अशी रत्न

सैनिनीयू लेजर असं या खाण मालकाचं नाव असून सापडलेली दोन्ही रत्न म्हणजेच जेमस्टोन्स हे गडद जांभळ्या आणि निळ्या रंगाची आहेत. एकाचे वजन ९.२७ किलो आहे तर दुसऱ्याचे ५.१०३ किलो. टांझानियाच्या राष्ट्रपतींनी ही दोन्ही रत्न देशाची राजधानी असणाऱ्या डोडोमामधील संग्रहालयामध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या खाणीमध्ये खोदकाम करताना ही रत्न सापडली आहेत. अशाप्रकारची रत्न केवळ पूर्व आफ्रिकेमधील उत्तरेकडील भागांमध्ये सापडतात असं सांगण्यात येतं.

राष्ट्रपतींनी केला फोन

ही दोन्ही रत्न टांझानियामधील एका बँकेने विकत घेतली आहेत. एका लहानश्या समारंभामध्ये सैनिनीयूला या रत्नांच्या मोबदल्यात मोठी रक्कम देण्यात आली. या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपणही करण्यात आलं. या वेळेस राष्ट्रपती जॉन मगुफुली यांनी फोनवरुन सैनिनीयूला याला रत्न शोधल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

(Photo: Tanzania Ministry of Minerals/via Reuters)

या पैशांनी काय करणार

सैनिनीयू चा मूळ व्यवसाय पशूपालनाचा आहे हा मेंढपाळ आहे. त्याच्या मालकीची एक छोटी खाणही आहे. या खाणीत रत्न मिळतील या अपेक्षेने त्याने ती सुरु केली होती. जूनच्या तिसऱ्या आठवड्यामध्येच त्याला ही रत्न मिळाली होती. ही रत्न एवढी महागडी असतील असं त्याला वाटलंही नव्हतं. जेव्हा ती विकण्यासाठी सैनिनीयूने सरकारी यंत्रणांशी संपर्क साधला तेव्हा त्याला ही रत्न खूपच मैल्यवान असल्याचे समजले. या पैशांमधून एक शाळा आणि शॉपिंग मॉल सुरु करण्याची सैनिनीयूची इच्छा आहे. सैनिनीयूला गरिबीमुळे शिकता आलं नाही. मात्र आपल्या मुलांनी आणि आजूबाजूच्या परिसरातील गरीब मुलांनी शिकावं अशी त्याची इच्छा असल्याने त्याने शाळा बांधणार असल्याचं म्हटलं आहे.