नशिबात असतं तेवढचं सर्वांना मिळतं असं म्हटलं जातं. मात्र आपलं नशिबचं वाईट आहे म्हणून अनेकजण कायम रडत असतात. तर काहीजणांना अगदी क्षणात भरभरुन मिळतं. जून महिन्यामध्ये असंच काहीसं झालं टांझानियामधील सैनिनीयू लेजर या खाण मालकाबरोबर. सैनिनीयू लेजरला खोदकाम करताना खाणीमध्ये दोन अनमोल रत्नं मिळाली. ही रत्नं त्याने सरकारच्या ताब्यात दिल्याच्या मोबदल्यात त्याला ७.७४ बिलीयन टांझानियन शिलिंग म्हणजेच २५ कोटी ३६ लाख रुपये देण्यात होते. या घटनेला महिन्याभराहून थोडा अधिक काळा झालेला असतानाच आता लेजरला पुन्हा एक मौल्यवान रत्न सापडल्याचं वृत्त आफ्रिका न्यूजने दिलं आहे. या रत्नाची किंमत दोन मिलियन डॉलर म्हणजे १५ कोटी ४ लाखांच्या आसपास आहे.  विशेष म्हणजे आता हे पैसे लेजर समाजासाठी वापरणार आहे.

नक्की पाहा हे फोटो  >> Top 10 : या दहा देशांकडे आहे सर्वाधिक सोनं, पहिल्या स्थानावर आहे…

जून महिन्यामध्ये लेजर यांना सापडलेली दोन्ही रत्न म्हणजेच जेमस्टोन्स हे गडद जांभळ्या आणि निळ्या रंगाची होती. एकाचे वजन ९.२७ किलो आहे तर दुसऱ्याचे ५.१०३ किलो होते. टांझानियाच्या राष्ट्रपतींनी ही दोन्ही रत्न देशाची राजधानी असणाऱ्या डोडोमामधील संग्रहालयामध्ये ठेवण्याचे आदेश दिल्याने लेजर यांनी ती बँकेला विकली होती. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या खाणीमध्ये खोदकाम करताना ही रत्न सापडली होती. अशाप्रकारची रत्न केवळ पूर्व आफ्रिकेमधील उत्तरेकडील भागांमध्ये सापडतात असं सांगण्यात येतं. असेच एक रत्न पुन्हा लेजर यांना सापडलं असून ते ६.३ किलोचे आहे. हे रत्नही लेजर सरकारच्या ताब्यात देणार आहेत. “या पैशाचा मी समाजासाठी वापर करणार आहे. मी स्वत: आतापर्यंत दोन शाळा उभारल्या आहेत. खाणकामामधून मिळालेल्या पैशामधून मी या शाळा उभारल्यात,” असं लेजर सांगतात.

लेजर यांना जूनमध्ये सापडलेली दोन्ही रत्न टांझानियामधील एका बँकेने विकत घेतली होती. एका समारंभामध्ये लेजर यांना या रत्नांच्या मोबदल्यात मोठी रक्कम देण्यात आली होती. या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपणही करण्यात आलं होतं. त्या वेळेस राष्ट्रपती जॉन मगुफुली यांनी फोनवरुन लेजर यांना रत्न शोधल्याबद्दल शुभेच्छा दिलेल्या.

यापूर्वीही व्यक्त केली होती शाळा बांधण्याची इच्छा

जूनच्या तिसऱ्या आठवड्यामध्येच रत्न मिळाल्यानंतर, ही रत्न एवढी महागडी असतील असं वाटलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया जेव्हा लेजर यांनी दिली होती. ही रत्न विकण्यासाठी लेजर सरकारी यंत्रणांशी संपर्क साधला तेव्हा ती ही रत्न खूपच मैल्यवान असल्याचे त्यांना समजले. ही रत्न विकून मिळालेल्या पैशांमधून एक शाळा आणि शॉपिंग मॉल सुरु करण्याची इच्छा लेजर व्यक्त केली होती. लेजर यांना गरिबीमुळे शिकता आलं नाही. मात्र आपल्या मुलांनी आणि आजूबाजूच्या परिसरातील गरीब मुलांनी शिकावं अशी त्यांची इच्छा असल्याने त्याने शाळा बांधणार असल्याचं म्हटलं होतं.

५२ वर्षीय लेजर यांना चार पत्नी असून एकूण ३० मुले आहेत. या भागामध्ये लेजर यांच्यासारखे अनेक लहान खाणकाम मालक आहेत. हे खाणकाम मालक सरकारी परवाना मिळवून खाणकाम करतात. मात्र येथे अनधिकृत खाणकाम ही मोठी समस्या निर्माण झाल्याचेही चित्र दिसत आहे.