News Flash

Tauktae Cyclone: तौक्तेनं जाग्या झाल्या भयानक ‘निसर्ग’च्या आठवणी

३ जून २०२० ला निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकले होते

Express photo: Nitin RK

करोनाशी लढा देणाऱ्या महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाला अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला आहे. या वादळाने मागील वर्षी तीन जून रोजी मुंबईजवळून गेलेल्या निसर्ग चक्रीवादळाची आठवणी पुन्हा ताज्या केल्यात. तौक्ते चक्रीवादळाप्रमाणेच निसर्ग चक्रीवादळामध्येही वाऱ्याचा वेग प्रचंड होता. रायगडसह किनारपट्टी परिसरात निसर्ग वादळाच्या वेळी जोरदार पाऊसही कोसळला होता. दुपारी दीडच्या सुमारास चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीवरून जमिनीवर पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर अलिबाग मार्गे हे वादळ मुंबईत दाखल होणार होतं. त्यापूर्वीच वादळानं दिशा बदलल्याने मुंबईवरील संकट टळलं होतं. मात्र आज तौक्ते वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने पुन्हा एकदा निसर्ग वादळाची आठवण करुन दिलीय.

सध्या सोशल मीडियावर ज्याप्रमाणे चर्चा सुरु आहेत तशीच चर्चा वर्षभरापूर्वी निसर्ग वादळाबद्दल सुरु होती. निसर्ग चक्रीवादळ अलिबाग ओलांडून मुंबईच्या दिशेनं येत असल्याने वाऱ्याचा वेग वाढला होता. त्याचा परिणाम विमानतळावरून असलेल्या हवाई वाहतुकीवर याचा परिणाम झाला होता. मुंबई विमानतळावरील वाहतूक सायंकाळी सात वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली होती. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर आज (१७ मे रोजीही) मुंबई विमानतळावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच वांद्रे वरळी सी लिंकवरील वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे.

निसर्गमुळे वीज यंत्रणा कोलमडून पडली…

३ जून २०२० ला निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकले होते. याचा सर्वाधिक फटका रायगड जिल्ह्यााला बसला. अलिबाग, पनवेल, कर्जत, उरण, खालापूर, पेण, रोहा, मुरुड, तळा, माणगाव, म्हसळा, महाड, पोलादपूर व श्रीवर्धन तालुक्यांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. या परिसरातील वीज वितरण यंत्रणा पूर्णपणे उद्धवस्त झाली होती. ३२ स्विचिंग उपकेंद्र, २६१ फीडर, १९७६ गाव, ६७७३ वितरण रोहित्र, ७०१५ उच्चदाब खांब, १४,८६५ लघुदाब खांब वादळाच्या तडाख्यात सापडले. या नुकसानामुळे १० लाखांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र या वादळामध्ये शेतांमध्ये पडलेले विद्युत खांब वादळानंतर दहा महिन्यांनीही काही ठिकाणी अजून तसेच पडलेले असल्याने येत्या पावसाळ्यातील शेती कशा प्रकारे करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

तौक्ते चक्रीवादळ अतितीव्र

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने रविवारी अतिरौद्र रूप धारण केले असून, वेगवान होत ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने निघाले आहे. रविवारी या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्रासह गोवा, केरळ आदी भागाला जोरदार तडाखा दिला. सोमवारी (१७ मे) मुंबई परिसर, ठाणे, पालघर आणि रायगड या भागांवर चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण भागांत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

१७० किलोमीटर वेगाने वारे

चक्रीवादळाचा परिणाम म्हणून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागांमध्ये शनिवारपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला केरळ, कर्नाटक राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा फटका बसला. रविवारी सकाळी चक्रीवादळ अतितीव्र होऊन त्याचा वेगही वाढला. समुद्रामध्ये सध्या ताशी सुमारे १७० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. रविवारी संध्याकाळपर्यंत वेगाने चक्रीवादळ पुढे सरकत होते. गोव्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असताना या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. पुढे ते दक्षिण कोकण किनारपट्टीजवळ सरकले. त्यामुळे या भागात सोसाटय़ाच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला होता. याच कालावधीत कोल्हापूर आणि सांगली परिसरातही चक्रीवादळाचा परिणाम जाणवला. या भागातही जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूकही विस्कळीत झाली. बहुतांश भागांत विजेचे खांब कोसळले, त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. पश्चिम घाट परिसरात सर्वदूर वादळी वारा आणि जोरदार पाऊस झाला.

आज मुंबई, ठाण्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता

अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळ मुंबईला धडकणार नसले तरी समुद्रातून गुजरातकडे सरकणाऱ्या या वादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्य़ांतही अतिमुसळधार पाऊस आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. मुंबई, ठाणे जिल्ह्य़ासाठी सोमवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर येथेही सोमवार आणि मंगळवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्य़ांमध्ये सोमवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर सोसाटय़ाचे वारे वाहण्याचीही शक्यता आहे. या कालावधीत साधारण ७० ते ९० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मच्छिमारांनीही समुद्रात जाऊ नये असे आवाहन हवामान विभाग आणि महापालिकेने केले आहे.

मुंबईतील वातावरण बदललं

या वादळाने शनिवार रात्रीपासूनच मुंबईतील वातावरण बदलून गेले. शनिवारी रात्री आणि रविवारीही मुंबईतील अनेक भागांत पावसाच्या सरींनी हजेरी लावली. हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्राने २८.८ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्राने २८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली होती. मात्र, रविवारी पावसाच्या सरींमुळे किमान आणि कमाल तापमानातही काहिशी घट झाली. रविवारी सांताक्रुझ केंद्राने २६.४ अंश सेल्सिअस किमान तर ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली. कुलाबा केंद्राने २७.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची तर ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 11:28 am

Web Title: tauktae cyclone reminds same situation of last year during nisarga cyclone scsg 91
Next Stories
1 Social Viral: श्रीराम लागूंप्रमाणे कोरोनीलची जाहिरात करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई व्हावी का?
2 करोना काळातही पिकासो यांच्या ‘या’ पेंटिंगची तब्बल ७५५ कोटींना विक्री!
3 Video: अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात १ हजार १११ हापूस आंब्याची आरास; घ्या दर्शन
Just Now!
X