एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला दिशा देण्यात आणि जडणघडण करण्यात गुरूचा वाटा खूप मोठा असतो. गुरुच्या सन्मानासाठी देशभरात ‘शिक्षक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. जगभरात वेगवेगळ्या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारतात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षक दिनानिमित्त गुगलनंही खास डुडल तयार करून गुरुला वंदन केलंय.

शिक्षणाचं मह्त्त्व खूप मोठं आहे. शिक्षणाशिवाय कोणताही विकास साधणं शक्य नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचं स्थान मोठं असतं. त्यांच्या आयुष्याला दिशा देणं, करिअर घडवण्यात शिक्षकांचा म्हणजेच गुरुचा वाटा मोठा असतो. याच गुरुचं महत्त्व गुगलनं आपल्या डुडलमधून सांगितलं आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदींनीही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे सर्वोत्तम शिक्षक होते, असं त्यांनी ट्विटरवर म्हटलंय. आपल्या कल्पनेतील नवीन भारत प्रत्यक्षात उतरवण्यात शिक्षकांचा वाटा महत्त्वाचा आहे. संशोधन, सखोल अभ्यास आणि नवनिर्मितीचा ध्यास मनात ठेवून हे स्वप्न पूर्ण करूयात, असं दुसरं ट्विट करून त्यांनी देशवासीयांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.