आपल्या संस्कृतीत आईनंतर दुसरं महत्त्वाचं स्थान असतं ते गुरूला. आपल्या जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरूचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळेच आपल्याकडे शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे.. या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राजकारणात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली असली तरी शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख त्यांनी जपली, म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून ओळखला जाऊ लागला.
शिक्षणक्षेत्रात योगदान दिलेल्या शिक्षकांच्या आदरार्थ जगभरात हा दिवस साजरा करण्यात येतो. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे, म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण करणाऱ्या शिक्षकाचा आदर करण्याचा हा दिवस असतो. साधरण विसाव्या शतकापासून शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा जगभरात सुरू झाली. आपल्याकडे जरी हा दिवस ५ सप्टेंबरला साजरा करण्यात येत असला तरी जगभरात वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. पाच ऑक्टोबरला जगातील अनेक देशात शिक्षक दिन असतो. इंडोनेशिया, व्हिएतनाम देशात नोव्हेंबर महिन्यात, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ब्राझील, कॅनडा, चीली, जर्मनी यासारख्या देशात ऑक्टोबरमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात येतो.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 5, 2017 11:20 am