हेल्मेट घातलेल्या व्यक्ती कुठे दिसतात असे कोणी जर तुम्हाला विचारले, तर बाईक चालविणारा व्यक्ती किंवा बांधकामाच्या ठिकाणी काम करणारा व्यक्ती अगदी सहज तुमच्या डोळ्यासमोर येईल. मात्र शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवताना हेल्मेट घातलेले तुम्ही कधी पाहिलेय? नाही ना? तर तेलंगणामधील मेदक येथील सरकारी शाळेतील शिक्षक तुम्हाला या अवस्थेत दिसू शकतात. आता शिकवताना हेल्मेट कशाला लागते असा प्रश्न तुम्हाला सहाजिकच पडला असेल.

तर शाळेचे बांधकाम तकलादू असल्याने कोणतीही दुर्घटना घडल्यास त्यापासून संरक्षण करण्यासाठी आणि गळणाऱ्या छतापासून वाचण्यासाठी हे शिक्षक वर्गात हेल्मेट घालून शिकवतात. काही दिवसांपूर्वी बिहारच्या सरकारी कार्यालयातील कर्मचारी अशापद्धतीनेच हेल्मेट घालून आपले काम करत होते. हा प्रकार ताजा असतानाच तेलंगणामधील हे शिक्षक हेल्मेटचा वापर करुन स्वतःचा बचाव करत आहेत. या शिक्षकांनी आतापर्यंत शाळेची इमारत खराब असल्याबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रार केली मात्र त्याचा काहीच उपयोग न झाल्याने अखेर त्यांनी हेल्मेट घालण्याचा पर्याय अवलंबला.

शाळेतील वर्गात हेल्मेट घालून बसलेले शिक्षक

आपण अशाप्रकारे हेल्मेच घालून आल्यास किमान प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल आणि काहीतरी कृती होईल अशी त्यांना आशा आहे. या शिक्षकांचे हेल्मेट घातलेले फोटो काही दिवसांपासून सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. छत गळणाऱ्या तसेच रंगाचे पोफडे अंगावर पडणाऱ्या वर्गामध्ये बसून विद्यार्थ्यांना शिकवणे अतिशय कठिण असल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यातच पावसाळा असल्याने पाऊस पडल्यावर तर वर्गात बसणेही कठिण होत असल्याने शिक्षण द्यायचे कसे असा त्यांचा प्रश्न आहे.

केवळ वर्गातच नाही तर या शिक्षकांना स्टाफ रुममध्येही हेल्मेट घालून बसण्याची वेळ आली आहे. तीन वर्षांपासून ही परिस्थिती अशीच असून त्यावर कोणताही मार्ग अद्याप काढण्यात आलेला नाही. त्यामुळे योग्य त्या पायाभूत सुविधाच उपलब्ध नसतील तर ‘कैसे पढेगा इंडिया’ असा प्रश्न निर्माण होत आहे.