22 November 2017

News Flash

सेरेनाचा चिमुकलीसोबतचा सेल्फी व्हायरल

मुलीचे नावही केले जाहीर

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 14, 2017 8:15 PM

सेरेनाचा आपल्या चिमुकलीसोबतचा सेल्फी

टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्स हिच्या घरी नुकतंच छोट्या परीचं आगमन झालं आहे. आपल्या या चिमुकलीचे फोटो सेरेनाने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बाळाच्या जन्मानंतर अवघ्या दोन आठवड्यातच सेरेनाने आपल्या मुलीसोबतचा सेल्फी इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या पोस्टमध्ये सेरेनाने आपल्या मुलीचे नावही जाहीर केले आहे. आपल्या या परीचे नाव तिने एलेक्सिस ओलंपिया ओहानियन असे ठेवले आहे.

यापूर्वी सेरेनाने गर्भवती असतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली होती. जगभरातील अनेक सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या. सेरेना आई झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक मजेशीर पोस्टही पाहायला मिळाल्या. सेरेनाचं बाळ गर्भाशयात टेनिस खेळत असल्याचे फोटो एका चाहतीने पोस्ट केले होते. तर एकाने मुलीचं स्वागत करताना म्हटलं आहे की, सेरेनाने आजच आपल्या मुलीला जन्म दिलाय आणि ती टेनिसच्या जागतिक क्रमवारीत ९८ व्या स्थानावर आहे. एका महान टेनिसपटूच्या पोटी मुलीने जन्म घेतलाय, त्यामुळे आणखीन एका कणखर आणि लढाऊ महिलेचं या भूतलावर आगमन झालंय, असे या चाहत्याने म्हटले होते.

गर्भवती असताना देखील सेरेना जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळली होती. ग्रँड स्लॅम जिंकल्यानंतर गर्भवती असल्याची बातमी सांगून तिनं चाहत्यांचा आनंद द्विगुणीत केला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या सेल्फीला जवळपास ९ लाख २१ हजार लाईक्स मिळाले आहेत. याबरोबरच ३१ लाख जणांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सेरेनाच्या गोंडस मुलीचा फोटो पाहून तुम्हालाही नक्कीच आनंद वाटेल.

First Published on September 14, 2017 8:15 pm

Web Title: tennis star serena williams share first selfie of her baby girl alexis olympia ohanian on her instagram account