स्कायवॉक म्हणजे उंचावरुन जाणारे चालण्यासाठीचे रस्ते. वाहनांचा अडथळा टाळण्यासाठी किंवा आणखी काही कारणाने हे स्कायवॉक केलेले असतात. पण तुम्ही कधी हजार फूटांवर असलेला स्कायवॉक पाहिला आहे? तोही काचेचा आणि संपूर्ण शहराचे दर्शन घडवणारा. बँकॉकमध्ये महानाखोन येथे अशाप्रकारे एक अनोखा स्कायवॉक बांधण्यात आला आहे. थायलंडमधील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंग पॉवर या इमारतीच्या ७८ व्या मजल्यावर हा स्कायवॉक बांधण्यात आला आहे. हा स्कायवॉक १०३० फूट उंचीवर असून ३१४ मीटर उंचीवर आहे.

विशेष म्हणजे या काचेच्या पारदर्शक असलेल्या स्कायवॉकरुन तुम्हाला ३६० अंशात पूर्ण बँकॉकचे दर्शन घडणार आहे. बँकॉक पर्यटनासाठी प्रसिद्ध असून हा स्कायवॉक पर्यटकांसाठी एक उत्तम अनुभव ठरणार आहे. स्कायवॉकचा शब्दश: अर्थ पर्यटकांना याठिकाणी अनुभवता येणार आहे. इतक्या उंचीवरुन आपल्या पायाखाली दिसणाऱ्या उंचच्या उंच इमारती, वळणाचे रस्ते आणि बँकॉक शहराचे दर्शन नागरिकांना आणि पर्यटकांना घेता येणार आहे.

या स्कायवॉकवर जाण्यासाठी पर्यटकांनी सुरक्षात्मक फॅब्रिक बुटीज घालणे आवश्यक आहे. इतक्या उंचावर असलेल्या या स्कायवॉकवरुन चालताना अनेकांचा भितीने थरकाप उडत होता तर अनेक जण अजिबात न घाबरता यावरुन चालत होते. बऱ्याच जणांनी या स्कायवॉकवर वेगवेगळ्या पोझ देत आपले फोटोही काढून घेतले. रुफटॉप प्लॅटफॉर्म असलेल्या या मजल्यावर एक बारही आहे. तुम्हाला उंचीची भिती वाटत नसेल तर ही जागा तुम्हाला फिरण्यासाठी अतिशय उत्तम आहे.