नवरा बायकोमधील वाद ही तशी सामान्य गोष्ट आहे. मात्र कधीतरी हे वाद अगदी टोकाला जातात आणि त्याचे रुपांतर गंभीर गुन्ह्यामध्ये होते. असाच काहीसा प्रकार घडला ब्राझीलमध्ये. ब्राझीलमधील एका दांपत्याचा वाद एवढा टोकाला गेला की या वादामध्ये एका तरुणीची मृत्यू झाला. मित्रांबरोबर बसलेल्या आपल्या पतीच्या दिशेने त्याच्या पत्नीने गोळीबार केला आणि गोळी या टेबलवर तिच्या नवऱ्याच्या बाजूला बसलेल्या तरुणीला लागली. यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना ब्राझीलमधील तियांगुआ येथे घडली. मागील गुरुवारी या दांपत्यामध्ये कडाक्याचे भांडणं झालं. ३१ वर्षीय डायेन राफेला डिसिलव्हा रॉड्रिगेज या महिलेचा पती त्याच्या मित्रांसोबत एका बारमध्ये बसला होता. याच टेबलवर या महिलेच्या नवऱ्याच्या बाजूला २६ वर्षीय जाएन बटिस्टा बारो ही तरुणी बसली होती. भांडणानंतर बारमध्ये मित्रांना भेटायला आलेल्या नवऱ्यावर संतापलेल्या रॉड्रिगेजने बारच्या मुख्य प्रवेशद्वारामधून ता प्रवेश करत नवरा कुठे बसला आहे हे शोधलं आणि तो दिसताच त्याच्या दिशेने हातातील बंदुकीने गोळीबार सुरु केला. रॉड्रिगेज मारलेली एक गोळी थेट बारोच्या डोक्यात लागली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

रॉड्रिगेजने ज्या अंदाधुंद गोळ्या चालवल्या त्यामध्ये एक २४ वर्षीय तरुणही जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रॉड्रिगेज या बारमध्ये एका व्यक्तीसोबत बाईकवर आल्याचे दिसून आलं आहे. बारच्या बाहेर बाईकवरुन उतरल्यावर रॉड्रिगेज एक हॅण्डबॅग घेऊन बारमध्ये प्रवेश करते आणि नवऱ्याला पाहताच बँगमधून बंदूक काढून नवऱ्याच्या दिशेने गोळीबार करते. पत्नीने केलेल्या हल्यामधून स्वत:ला वाचवत तिचा नवरा तिच्या हातातून बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो. या झटापटीमध्ये बंदूक पडते पण पुढे या बंदुकीचं काय झालं यासंदर्भातील माहिती अद्याप मिळालेली नाही.

या हल्ल्यानंतर पोलिसांनी रॉड्रिगेजला अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पतीवर संतापल्याने रागाच्याभरात या महिलेने गोळीबार केला. बारमध्ये जाण्यावरुन या दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या महिलेने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबामध्ये तिने पतीवर गोळीबार करण्याच प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे. मरण पावलेल्या मुलीला आपण ओळखत नसल्याचेही रॉड्रिगोजने म्हटलं आहे.