राज्याभिषेक अवघ्या काही दिवसांवर असताना थायलंडचे राजा महा वजीरालोंगकोर्न यांनी आपल्या सुरक्षापथकाचे कमांडर सुथिदा तिजाई यांच्याशी लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. लग्नानंतर त्यांनी सुथिदा यांना राणीचा दर्जा दिला आहे. येत्या काही दिवसांतच थायलंडच्या राजाचा अधिकृतरित्या राज्याभिषेक होणार आहे.

वजीरालोंगकोर्न यांचं हे चौथं लग्न आहे. ते ६६ वर्षांचे आहेत. त्यांना तीन राण्यांपासून पाच मुलं आणि दोन मुली आहेत. ‘रॉयल गॅझेट’ या वृत्तपत्रातून या शाही लग्नाची घोषणा करण्यात आली. बुधवारी पार पडलेल्या या लग्नाच्या विधी थाय वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करण्यात आल्या.

वजीरालोंगकोर्न यांना राजा राम दहावे म्हणूनही ओळखलं जातं. त्यांचे वडील राजा भूमिबोल अदुल्यादेज यांचं १३ ऑक्टोबर २०१६ रोजी निधन झालं. त्यानंतर वजीरालोंगकोर्न  यांना राजा घोषित करण्यात आलं. राजा अदुल्यादेज यांच्या निधनावर एक वर्षाचा शोक घोषित करण्यात आला होता. त्यामुळे राजा वजीरालोंगकोर्न यांचा राज्याभिषेक करता आला नव्हता.

२०१४ मध्ये वजीरालोंगकोर्न यांनी सुथिदा तिजाई यांची पर्सनल बॉडीगार्ड युनिटमध्ये डेप्युटी कमांडर म्हणूण नियुक्ती केली होती. त्याआधी सुथिदा थायलंड एअरवेजमध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणूण काम करत होत्या. वजीरालोंगकोर्न हे राजा झाल्यावर त्यांनी सुथिदा यांना २०१६ मध्ये सेनेत जनरल हे पद दिलं होतं. २०१७ मध्ये त्या राजासोबत पर्सनल बॉडीगार्ड म्हणूण राहू लागल्या.