‘अति घाई संकटात नेई’, ‘वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा’ महामार्गावरून प्रवास करताना रस्त्याच्या कडेला या सूचना लावलेल्या असतात, पण आपण भारतीय या सूचनांकडे दुर्लक्ष करतो. कोण पाळतंय या सूचना? असं म्हणत वेगाची झिंग अशी काही चढलेली असते की हा वेग इच्छितस्थळी नाही तर मृत्यूच्या वाटेवर आपल्याला घेऊन जात आहे एवढीही सुबुद्धी अनेकांना सुचत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सहप्रवाशांचे प्राण धोक्यात घालून दोन बसचालक एकमेकांशी लवकर पोहोचण्याची शर्यत लावत आहे. एका मोटारचालकाने हे व्हिडिओ शूटिंग केलं आहे. तामिळनाडूच्या कोईंबतूर राष्ट्रीय महामार्गावरील हा व्हिडिओ आहे. वाहतुकीचे सारे नियम धाब्यावर बसवून बस चालवण्याऱ्या चालकांचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या दोघांवरही कारवाई करण्यात आली.

कोईंबतूर पोल्लाची महामार्गावर दोन खासगी बसचालकाने वाहतुकीचे सारे नियम पायदळी तुडवून मर्यादेपेक्षा जास्त वेगाने बस चालवली. या दोन्ही बस चालकांनी एकमेकांशी शर्यत लावली होती. या स्पर्धेत जिंकण्यासाठी या दोन्ही बस चालकांनी आत असलेल्या सगळ्याच प्रवाशांचे प्राण धोक्यात घालून वेगात बस चालवली. आधी पोहोचण्यासाठी या दोघांनी विरुद्ध दिशेला गाडी चालवली, त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या इतर चालकांचे जीवही त्यांनी धोक्यात घातले. एके ठिकाणी तर एका बस चालकाने रस्त्याच्या दुर्तफा लावलेली तारेची कुंपणंही मोडून टाकली. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर दोघांवरही कारवाई करत त्यांचे वाहन चालक परवाने रद्द करण्यात आले आहेत. पण समजा हे व्हिडिओ समोरच आले नसते तर प्रवासांचे जीव धोक्यात घालून त्यांच्या जीवांशी खेळण्याचा प्रकार या मुर्खांनी असाच सुरू ठेवला असता हे नक्की!