‘दारू पिऊन गाडी चालवू नका’ असं पोलिसांकडून वारंवार बजावलं जातं. नशेत अपघात होऊन स्वत:चा आणि दुसऱ्यांचा जीव जाण्याचा धोका अधिक असतो. पण, तरीही लोकांना या गोष्टींचं गांभीर्य कळत नाही. मग ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’मध्ये पकडलं जाऊ नये म्हणून पळण्याचे शंभर उपाय लोक शोधतात. असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

‘ब्रेथ अॅनेलाईजिंग टेस्ट’पासून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी एका व्यक्तींनं चक्क नदीत उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. आपण ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’मध्ये पकडलं गेलो तर पोलीस काही आपल्याला सोडणार नाही हे कळल्यावर या व्यक्तीनं कोणताही विचार न करता नदीत उडी मारून पोहत पलिकडे जाण्याचा प्रयत्न केला. पण नशेत असल्यामुळे पोहून जाणं तर दूरच राहिलं हा व्यक्ती जवळजवळ नदीत बुडून मरण्याचा धोकाच निर्माण झाला. शेवटी पोलिसांनी नदीत उडी घेत शर्थीचे प्रयत्न करत या व्यक्तीला वाचवलं.

पोलिसांपासून पळ काढण्याचा प्रयत्न यशस्वी तर झालाच नाही, पण शिक्षा म्हणून पोलिसांनी या व्यक्तीचा वाहतूक परवाना ६ महिन्यासाठी रद्द केला आणि जवळपास २५ हजारांचा दंड ठोठावला.