News Flash

तरूण शेतकऱ्याच्या भन्नाट कल्पनेतून आकाराला आले ‘Trump Tatya’ फेसबुक पेज!

जाणून घ्या कोण आहेत ते

तरूण शेतकऱ्याच्या भन्नाट कल्पनेतून आकाराला आले ‘Trump Tatya’ फेसबुक पेज!
अमित वानखेडे, गौरव यादव, वैभव कोकाट, संजय श्रीधर, विश्वनाथ घाणेगावकर आणि राहुल ढवळे यांनी हे फेसबुक पेज सुरू केलं (छाया सौजन्य : Trump Tatya ट्रम्प तात्या)

‘Trump Tatya ट्रम्प तात्या’ हे फेसुबक पेज एव्हाना आपल्या मराठमोळ्या तरूण मंडळींना चांगलेच परिचयाचे झाले असेल. ट्रम्प गावरान मातीत आले तर ते कसे बोलतील अन् एखाद्या प्रसंगावर ते कसे वागतील हे जर पाहायचं असेल तर ‘Trump Tatya ट्रम्प तात्या’ हे फेसबुक पेज एकदा सर्फ करून पाहाच. इतके मजेशीर व्हिडिओ असतात की यामागे डोकं तरी कोणाचं राव? असा प्रश्न सहज मनात येऊन जातो. अनेकदा सोशल मीडियावर तुफान प्रसिद्ध होणाऱ्या या फेसबुक पेजच्या मागचं क्रिएटीव्ह डोकं आपल्याला माहिती नसतं. तेव्हा सध्या सुपर डुपर हिट होत चाललेल्या ‘Trump Tatya ट्रम्प तात्या’ या पेजच्या ‘मास्टर माईंड’ लोकांची गाठ त्यांच्या चाहत्यांशी घालून द्यायंचं आम्ही ठरवलंय.

अमित वानखेडे, गौरव यादव, वैभव कोकाट, संजय श्रीधर, विश्वनाथ घाणेगावकर आणि राहुल ढवळे यांच्या सुपिक डोक्यातून सात एक महिन्यांपूर्वी ‘Trump Tatya ट्रम्प तात्या’ हे फेसबुक पेज आकाराला आले. त्याला कारण ही तसंच होत म्हणा, अगदी अनपेक्षितपणे हिलरी क्लिंटन यांना हरवून डोनाल्ड ट्रम्प निवडून आले. त्यांच्या विजयानं अमेरिकाच काय साऱ्या जगाला धक्का बसला. अर्थात या गोष्टींची चर्चा जशी जगभरात झाली, तशी ती यांच्या गावाकडेही झाली. आता गावाच्या साध्या भोळ्या माणसांना हे ट्रम्प तात्या कसे बुवा निवडून आले हे समजेनाच. गावच्या पारावर मंडळीची ट्रम्पच्या विजयावर चांगलीच चर्चा रंगली. शेवटी नवस वगैरे बोलून ट्रम्प तात्या निवडून आले असतील, असा साधा निष्कर्ष भाबड्या गावकऱ्यांनी काढला. आता खेड्यापाड्यातल्या लोकांना ट्रम्पबद्दलची एवढी ओढ पाहून ट्रम्प तात्यांवर काहीतरी हटके करण्याची कल्पना अमितच्या डोक्यात आली आणि त्यानंतर सुरू झाला तो या फेसबुक पेजचा प्रवास. तशी फेसबुकवर नेत्यांची टिंगल करणारे शेकडो पेजेस असतील पण गावच्या मातीतून जन्माला आलेलं हे फेसबुक पेज मात्र वरचढ ठरलं.

untitled-1

 

अमित स्वत: शेतकरी आहे. २८ वर्षांचा अमित शेतीची काम करत हे पेज चालवतो. अर्थात हे सारं काम गौरव, वैभव, संजय, विश्वनाथ आणि राहुल यांच्याशिवाय शक्य नाही. अमित यवतमाळच्या आर्णी इथला, संजय श्रीधर आणि विश्वनाथ बार्शीचे, गौरव, वैभव मुंबईचे तर राहुल पुण्याचा अशी ही सहा जणांची अफलातून टीम आपल्या सुपिक डोक्यातल्या एकापेक्षा एक हटके कल्पना वापरून अनेकांचं मनोरंजन करत असते. आता तुम्हाला कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल की या सहा जणांनी प्रत्यक्षात मात्र एकमेकांना पाहिलंच नाही. व्हॉट्सअॅप फेसबुकच्या माध्यमातून ही टीम एकमेकांशी संपर्कात असते.

untitled-2

हे सहाही जण आपापल्या कामात व्यग्र असतात आणि जसा वेळ मिळेल तसं या पेजसाठी कॉन्टेंट तयार करण्याचं काम करतात. या पेजवरचे तर काही व्हिडिओ तुफान हिट ठरले. जर ट्रम्प यांची पत्रकार निखिल वागळेंनी ग्रेट भेट घेतली तर ती कशी असेल याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या ‘खास रे टीव्ही’ या युट्युब चॅनेलवर टाकला होता आणि हे व्हिडिओ तर अनेकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. खुद्द निखिल वागळेंनीही याबद्दल आपलं कौतुक केल्याचं अमित सांगतो. यातून आर्थिक फायदा होत नसला तरी निव्वळ लोकांचं मनोरंजन व्हावं एवढा उद्देश ठेवून हे सहाही जण यावर मेहनत घेत आहेत.

प्रतिक्षा चौकेकर
pratiksha.choukekar@indianexpress.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2017 12:39 pm

Web Title: the men behind donald trump parody page
Next Stories
1 ‘ही’ वेगवान बुलेट ट्रेन तुम्ही पाहिलीये?
2 Viral Video : म्हणून ‘स्मार्ट वर्क’ करा! नाहीतर अशी गत व्हायची
3 अबब! घोणस जातीच्या सापाने दिला ६५ पिल्लांना जन्म
Just Now!
X