‘खरं तर या प्राण्याला पाणी आवडत नाही, नदी ओलांडायची त्याला भीती वाटते. कारण, या नदीत मृत्यू त्याची वाट पाहत असतो, म्हणूच तो कधीही नदी ओलांडायचा प्रयत्न करत नाही. पण, आता मात्र त्यानं नदी ओलांडली आणि हा क्षण कॅमेरात कैद करण्यावाचून मी स्वत:ला रोखू शकलो नाही’ नॅशनल जिओग्राफी २०१७ च्या नेचर फोटोग्राफीचा पुरस्कार पटकावलेल्या जयप्रकाश यांची ही प्रतिक्रिया होती.

नदी ओलांडण्याचा प्रयत्न करणारा ओरांगउटानच्या छायाचित्रानं त्यांना हा मानाचा पुरस्कार पटकावून दिला. जशी प्रत्येक छायाचित्रामागे काहीना काही गोष्ट दडली असते तशीच ओरांगउटानच्या छायाचित्रामागेही एक गोष्ट दडली आहे. “Face to face in a river in Borneo,” या नावानं हे छायाचित्र प्रसिद्ध झालं. जयप्रकाश जोगी बोजन यांनी इंडोनेशियातील एका जंगलात हे छायाचित्र टिपलं. जंगलात छायाचित्र टिपण्यासाठी गेले असताना एक नर ओरांगउटान नदी ओलांडत असल्याची माहिती त्यांना मिळाली. खरं तर नदीत असंख्य मगर घात लावून बसलेल्या असतात. मगरीपासून ओरांगउटानच्या जीवाला धोका असतो म्हणून नदी ओलांडण्याची जोखीम हे प्राणी कधीही घेत नाही. नदीची त्यांना भीती वाटते म्हणून त्यांना नदी ओलांडताना यापूर्वी कधीही कोणी पाहिलं नाही. पण, जयप्रकाश यांना मात्र या दुर्मिळ घटनेचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली. वाढती जंगलतोड आणि पामची शेती यामुळे ओरांगउटानचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे, त्यांची जीवनशैली बदलत चालली आहे आणि बदलत्या परिस्थितीशी हळूहळू मिळतेजुळते घेण्याची कला हा प्राणी आत्मसात करत आहे. त्यासाठी तो जोखीमही पत्करत आहे हे जयप्रकाश यांच्या लक्षात आले. म्हणून जगापुढे ही परिस्थिती आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

या फोटोसाठी कित्येक तास ते पाच फूट खोल नदीत उभे होते. मला डास चावत होते, शिवाय नदीत इतरही धोका होताच पण, मला फक्त आणि फक्त ती दुर्मिळ घटना पाहायची होती म्हणूनच मी देखील तहान भूक, त्रास विसरून हा फोटो टिपण्याचा प्रयत्न केला अशी प्रतिक्रिया जयप्रकाश यांनी दिली.