काही दिवसांपूर्वी ‘नॅशनल जिओग्राफीक’ मासिकानं प्लास्टिकच्या समस्येवर लक्ष वेधणारा अंक प्रकाशित केला होता. प्लास्टिकची समस्या ही हिमनगासारखी आहे. वरवर छोटी दिसत असली तरी पृथ्वीवरील सजीवांचा घास घेण्याइतकी ती मोठी आहे हे यानिमित्तानं पुन्हा एकदा समोर आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात असे कितीतरी अस्वस्थ करणारे फोटो समोर आले. प्लास्टिकमुळे कित्येक समुद्री जीवांना आपले जीव गमवावे लागले आहेत. इतकंच नाही तर गेल्या दोन तीन महिन्यात किनाऱ्यावर वाहून आलेल्या देवमाशाच्या पोटातही प्लास्टिक आढळलं होतं. त्यामुळे प्लास्टिकच्या भस्मासुराला वेळीच आळा घातला पाहिजे नाहीतर आतापर्यंत केवळ प्राणी पक्ष्यांच्या जीवावर उठलेला प्लास्टिकचा हा भस्मासूर कधी माणसालाही गिळंकृत करेल हे कळणारही नाही.

गेल्या आठवड्यात काही पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकारांना चोचीत प्लास्टिकची रिंग अडकलेला करकोचा दिसला होता. हजारो किलोमीटरचं अंतर कापून करकोच्यांचा थवा पाणथळ जागी आला होता. या स्थलांतरित पक्ष्यांचे फोटो टिपण्यासाठी गुरुग्रामच्या पाणथळ ठिकाणी काही छायाचित्रकार गेले होते. त्यावेळी काही पक्षीप्रेमींनी जे काही पाहिलं ते मन हेलावून टाकणार होतं. चोचीत प्लास्टिकची रिंग अडकल्यानं या काळ्या मानेच्या करकोच्याला आपली चोच उघडता येत नव्हती. त्यामुळे आठवडाभर या पक्ष्याला काहीही खाता पिता येत नव्हतं. अखेर बॉम्बे हिस्ट्री सोसायटी आणि गुरुग्राम वन्यजीव विभागातील अधिकाऱ्यांनी या पक्ष्याची सुटका केली.

काही दिवस या पक्ष्याला निगराणीखाली ठेवण्यात आलं. दोन दिवसांनी त्याला पुन्हा एकदा जंगलात सोडण्यात येणार आहे. दरवर्षी ऑस्ट्रेलियातून हे पक्षी भारतात येतात. या पक्ष्यांची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.