केकचे किती प्रकार किंवा किती चवी तुम्हाला माहिती आहेत? ब्लॅक फॉरेस्ट, डच चॉकलेट, स्ट्रॉबेरी, व्हेनिला, चॉकलेट आणि अशी अनेक नावे तुमच्या ओठावर येतील. पण या सगळ्या प्रकरात तुम्ही या पारदर्शक केकचे नाव नक्कीच घेतले नसेल. पण यापुढे कदाचित तुम्हाला केकच्या दुकानात असा पारदर्शक केक दिसू शकतो. कारण या पारदर्शक आणि पाण्याच्या थेंबाप्रमाणे दिसणा-केकने केकप्रेमींच काय पण अनेकांना वेड लावले आहे. दिसण्यावरून या केकचे ‘रेनड्रॉप केक’ असे  नाव प्रचलित झाले आहे. जपानमध्ये तयार करण्यात आलेला हा केक तिथे खूपच प्रसिद्ध आहे. ‘मिझू शिंगेन मोची’ या नावाने जपानमध्ये हा पदार्थ प्रसिद्ध आहे. ‘मिझू’ या शब्दाचा जपानी भाषेत अर्थ होतो पाणी. हा केक पाण्यासारखा दिसतो म्हणून याचे नाव ‘मिझू शिंगेन मोची’ असे देण्यात आले आहे.

खर तर मैदा, अंडी, साखर यांच्या मिश्रणातून तयार झालेला आणि भट्टीत भाजल्या गेलेल्या पदार्थाला केक म्हणतात अशी जरी केकची व्याख्या तुम्हाला पाहायला मिळाली तरी वरीलपैकी कोणताच पदार्थ वापरुन हा केक तयार करण्यात आला नाही. तांदळाच्या पीठाचा वापर करून हा केक बनवण्यात आला आहे, इतकी त्रोटक माहिती या केकबद्दल उपलब्ध आहे त्यामुळे या केकने अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. विशेष म्हणजे हा केक अर्ध्या तासाच्या आत संपवायचा असतो कारण त्यापेक्षा जास्त काळ तो टिकू शकत नाही. ‘mithiruka’ या ट्विटर अकाउंटवरून या केकचा फोटो शेअर करण्यात आला. अल्पावधितच हा फोटो व्हायरल झाला आहे. तेव्हा असा केक आपल्याला कधी खायला मिळेल अशा प्रतीक्षेत खवय्ये आहेत.