निकोलस जामेट, जोनाथन नेमान आणि नथानिएल या तिघांनी शिक्षण सुरू असताना आगळं-वेगळं रेस्टॉरंट सुरू केले. त्यांच्या या रेस्टॉरंटमध्ये फक्त सलाड विकले जात असे. २००६ मध्ये वाशिंग्टनमधील जॉर्जटाउन विश्व विद्यापिठामध्ये शिक्षण घेताना या तिघांच्या मनात हेल्दी फास्ट फूड रेस्टॉरंट सुरू करण्याची भन्नाट कल्पना आली. आज तब्बल १२ वर्षानंतर तिघे तब्बल सात हजार कोटी रूपयांचे मालक आहेत.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिघेही जंक फूड खाणे टाळत होते. जंक फूड खाण्याने शरिरावर होणाऱ्या परिणामाची त्यांना कल्पना होती. पण शहरात मुबलक दरांमध्ये उपलब्ध असणारे हेल्दी फास्ट फूड रेस्टॉरंट एकही नव्हते. त्यावेळी त्यांच्या डोक्यात असं रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार आला. त्यावेळी जॉर्जटाउन येथे बंद पडलेल्या एका पबमध्ये त्यांनी रेस्टॉरंटमध्ये सुरू केले. या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी फक्त सलाड विक्रीसाठी ठेवलं होते.

काही महिन्यातच मित्र आणि कुटुंबातील परिवाराच्या मदतीने दोन कोटी रूपये जमा केले. ऑगस्ट २००७ मध्ये तिघांनी मिळून स्वीटग्रीन नावाने हेल्दी फास्ट फूड रेस्टॉरंटची सुरूवात केली. रेस्टॉरंटमध्ये काम करण्यासाठी विद्यार्थांना नेमलं. या तिघांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रेस्टॉरंटची जाहीरात केली. त्यांनी या हटके रेस्टॉरंटची वेबसाईटही तयार केली. याबद्दल विचारले असता जोनाथन सांगतात की, ‘लोकांमध्ये आपल्या स्वास्थविषयी जागरूकता वाढत गेली आणि आमच्या रेस्टॉरंटबाहेर रांगा लागल्या. लवकरच आमचे रेस्टॉरंट लोकप्रिय झाले.’

अल्पवधीतच स्वीटग्रीन रेस्टॉरंट लोकप्रिय झाले. लवकरच एका रेस्टॉरंटमुळे आम्ही लोकांची मागणी पूर्ण करण्यात अयशस्वी ठरू लागलो. त्यानंतर आम्ही स्वीटग्रीन रेस्टॉरंटची दुसरी शाखा वॉशिंगटनमध्ये उघडली. त्यासाठी हवी असणारी रक्कम उद्योगपती वॉल्टर रॉब, स्टीव केस आणि फ्रान्समधील प्रसिद्ध शेफ डेनिएल बोलुद यांच्याकडून उपलब्ध झाली. सध्या अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांमध्ये स्वीटग्रीन रेस्टॉरंटच्या ९० शाखा आहे. लवकरच आणखी २० शाखा सुरू करण्यात येणार आहेत.

स्वीटग्रीन रेस्टॉरंटमध्ये फक्त फळ आणि भाज्यांपासून बनवलेले पदार्थ उपलब्ध आहेत. फळ आणि भाज्या फक्त अमेरिकेतील शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जातात.