मीम्स म्हटल्यावर सर्वात आधी डोळ्यासमोर येते ते म्हणजे ट्रोलिंग. एखाद्याला लक्ष्य करुन त्याला ट्रोल करण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणारे शस्त्र म्हणजे मीम्स. मीम्स म्हटल्यावर आपसूकच आपल्या चेहऱ्यावर हसू येते. आजच्या डिजीटल जगामध्ये हास्य या शब्दाचा सन्मार्थी शब्द असलेल्या याच मीम्सचा अमेरिकेत मात्र जनजागृतीसाठी वापर केला जात आहे आणि तोही थेट सरकारकडूनच. विशेष म्हणजे मीम्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी सरकारच मीम्स तयार करत असून या आगळ्यावेग्ळ्या मोहिमेचे नेतृत्व करत आहेत अमेरिकेतील ग्राहक उत्पादन सुरक्षा आयोगाचे सोशल मिडिया एडीटर जोसेफ गॅल्बो.

अमेरिकेतील ग्राहक उत्पादन सुरक्षा आयोगाच्या अंतर्गत १५ हजारहून अधिक प्रोडक्टचा समावेश होतो. यामध्ये अगदी टोस्टर्सपासून ते टीव्ही ते स्नोकार्स निर्मात्यांचाही समावेश आहे. या कंपन्या आपल्या वस्तूंच्या वापरासंदर्भात जागृतीही करतात. जोसेफ अशाच प्रोडक्टच्या वापरासंदर्भातील संदेश सोशल मिडियाच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम करतात. मात्र त्यासाठी त्यांनी मीम्सचा मार्ग निवडला आहे. ‘तुम्हाला एखादा संदेश ग्राहकांपर्यंत जास्त प्रभावीपणे पोहचवायचा असल्याचे तो केवळ माहितीच्या माध्यमातून न देता तो अधिक चांगल्या प्रकारे मांडल्यास त्याचा परिणाम जास्त होतो. लोकांनी कधीही न पाहिलेल्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत संदेश पोहचवल्यास त्याचा जास्त फायदा होतो,’ असं जोसेफ सांगतात.

वेगवेगळ्या प्रोडक्टबद्दल जागृती करण्यासाठी ग्राहक उत्पादन सुरक्षा आयोगाकडून फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामचा वापर केला जातो. एक उदाहरण देताना जोसेफ यांनी उन्हाळ्यामध्ये मैदानात लोखंडी खेळणी वापरण्याआधी त्यांचे तापामान तपासून पाहण्यासाठी तयार केलेल्या मीममध्ये एक ड्रॅगन आपल्या तोंडातून मैदानातील लोखंडी खेळण्यांवर आग ओकताना दाखवला आहे. या ट्विटबरोबरच्या संदेशामध्ये ‘खेळाच्या मैदानातील वस्तू उन्हाळ्यामध्ये चटका बसण्याइतक्या तापतात. मैदानातील वस्तू वापरण्याआधी एकदा तपासून पाहा,’ असे म्हटले आहे.

अशाप्रकारे मीम्सच्या माध्यमातून जागृतीचे संदेश देणे फायद्याचे ठरत असल्याचे जोसेफ म्हणाले. या मीम्सला चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्ही समोर ठेवलेल्या उद्दीष्ठापेक्षा तिप्पट प्रतिसाद आम्हाला मिळतोय याचा आनंद आहे असं जोसेफ यांनी सांगितले.