24 April 2019

News Flash

जगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकची चीनी वृत्तसंस्थेकडून निर्मिती

चीननं जगातील पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेल्या वृत्तनिवेदकाची निर्मिती करून सगळ्यांनाच अचंबित केलं आहे.

झँगच्या पहिल्या वहिल्या बातमीपत्राचा व्हिडिओ क्षिनुआनं प्रसिद्ध केला आहे. झँग माणसासारखे हावभाव आणि मानवी आवाजात बोलू शकतो.

चीन हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखला जातो. मात्र या देशानं तंत्रज्ञान क्षेत्रातही तितकीच प्रगती केली आहे. हुबेहुब मानवासारख्या दिसणाऱ्या यंत्रमानवाची निर्मिती करून चीननं यापूर्वीच जगाला आश्चर्याचा धक्का दिला. काही महिन्यांपूर्वी याच देशानं छोट्या मुलांसोबत खेळण्याकरता खास यंत्रमानवाची निर्मिती केली होती. नुकतंच कृत्रिम चंद्राची निर्मीती करणार असल्याचंही जाहीर करूनही या देशानं जगाला आणखी एक आश्चर्याचा धक्का दिला.

आता मात्र चीननं जगातील पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेल्या वृत्तनिवेदकाची निर्मिती करून सगळ्यांनाच अचंबित केलं आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता असलेल्या या वृत्तनिवेदकाची निर्मिती चीनची आघाडीची वृत्तसंस्था क्षिनुआ आणि चिनी सर्च इंजिन कंपनी सोगोऊ यांनी मिळून केली आहे. या वृत्तनिवेदकाचं नाव झँग असं ठेवण्यात आलं आहे. झँग इंग्रजी आणि मँडेरिन भाषेत बातम्या वाचू शकतो.

झँगच्या पहिल्या वहिल्या बातमीपत्राचा व्हिडिओ क्षिनुआनं प्रसिद्ध केला आहे. झँग माणसासारखे हावभाव आणि मानवी आवाजात बोलू शकतो. झँगची कार्यक्षमता ही माणसांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तो जास्त वेळ काम करू शकतो. त्याच्यामुळे कामातल्या चुका कमी होतील आणि काम अधिक वेगानं होईल अशी प्रतिक्रिया क्षिनुआनं व्यक्त केली आहे.

First Published on November 9, 2018 2:45 pm

Web Title: the worlds first artificial intelligence tv news anchor made by chinas xinhua new agency