उंचीने लहान असणाऱ्यांना अनेकदा त्यांच्या उंचीवरुन चिडवले जाते. अनेक ठिकाणी त्यांना आपल्या लहान उंचीमुळे अडचणींचा समाना करावा लागतो. अनेक कार्यक्रमांमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी लहान उंचीमुळे समोर काय सुरु आहे याचा अंदाज लहान उंचीच्या लोकांना येत नाही. मात्र त्यांच्या या अडचणीवर एका संशोधकाने ‘पेरिस्कोप ग्लासेस’चा भन्नाट पर्याय शोधून काढला आहे.

डॉमनिक विलकॉक्स या व्यक्तीने ‘वन फूट टॉलर’ नावाचा अनोखा चष्मा तयार केला आहे. या चष्माच्या मदतीने लहान उंचीच्या व्यक्तींना त्यांच्या उंचीपेक्षा एक फूट अधिक वरुन समोरच्या गोष्टी पाहता येणार आहे. या चष्म्याच्या मध्यभागी ३०.५ सेंटीमीटर लांबीची एक दांडी असून त्यावर दोन रिफ्लेक्टर बसवण्यात आले आहेत. या चष्म्यामध्ये काचांऐवजी रिफ्लेक्टर वारण्यात आले आहेत. वरील रिफ्लेक्टरमधील इमेज डोळ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी चष्म्याच्या फ्रेममध्येही रिफ्लेक्टर बसवण्यात आले आहे. हा चष्मा घालून गर्दीच्या ठिकाणी किंवा गरज असेल तेथे लहान उंचीच्या व्यक्तींना एक फूट उंचावरून समोर दृष्य पाहता येईल.

‘मला आलेल्या एका अनुभवानंतर हा चष्मा बनवण्याची कल्पना सुचली’, असं विलकॉक्स सांगतो. ‘मी एका म्युझिक कॉनसर्टला गेलो होतो. त्यावेळी गाण्याचा आस्वाद घेत असताना मी मागे वळू पाहिले तेव्हा माझ्या उंचीमुळे माझ्या मागे उभ्या असलेल्या लहान उंचीच्या माहिलेला अडचण होत असल्याचे मला जाणवले. स्टेजवर काय सुरु आहे हे तिला मी समोर उभा राहिल्यामुळे दिसत नव्हते. यामुळे लहान उंचीच्या व्यक्तींना समोरचा अडथळा दूर करुन अधिक उंचीवरुन पाहता यावे असा चष्मा तयार करण्याची कल्पना मला सुचली,’ असं विलकॉक्सने आपल्या साईटवरील पोस्टमध्ये लिहीले आहे.

या ‘वन फूट टॉलर’ चष्म्यात वापरण्यात आलेले रिफ्लेक्टर हे काचेचे आवरण असणाऱ्या अॅक्रेलिकपासून बनण्यात आले असून ते ४५ अंशात बसवण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्ट या कंपनीने नवीन संशोधकांसाठी लंडनमध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी विलकॉक्स हा चष्मा तयार केला. ‘एक्ट्राऑर्डीनरी सोल्यूशन्स’ फॉर ‘एव्हरीडे प्रॉब्लेम’ म्हणजेच दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठीचे भन्नाट उपाय अशी या स्पर्धेची थीम होती.