पाकिस्तानी संघाचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी हा आपल्या धडाकेबाज खेळीसाठी क्रिकेट जगतात ओळखला जायचा. निवृत्तीनंतरही त्याच्या ‘बुम-बुम’ शैलीतील फलंदाजीचे अनेक चाहते आपल्याला पहायला मिळतील. मात्र शाहिद आफ्रिदीच्या नावाने अमेरिकतल्या टेक्सास राज्यातलं पोर्ट आर्थर शहर दरवर्षी ५ फेब्रुवारीला ‘शाहिद आफ्रिदी दिवस’ साजरा करतं.

पोर्ट आर्थर शहरात अनेक स्थलांतरित पाकिस्तानी नागरिक वास्तव्यासाठी आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या क्रिकेटपटूने आतापर्यंत केलेल्या विक्रमांचा गौरव करण्यासाठी स्थानिक पाकिस्तानी नागरिकांनी २०१४ साली सर्वप्रथम शाहिद आफ्रिदी दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.

यावेळी शाहीद आफ्रिदीनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांसोबतच्या आठवणींची छायाचित्र शेअर करत जुन्या क्षणांना पुन्हा एकदा उजाळा दिला.

तब्बल २१ वर्ष शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व केलं. या दरम्यान आपली आक्रमक फलंदाजी आणि श्रीलंकेविरुद्ध ३७ चेंडूत ठोकलेल्या शतकासाठी चाहते आफ्रिदीची नेहमी आठवण काढत असतात. २००९ साली टी-२० विश्वचषक जिंकण्यातही शाहिद आफ्रिदीचा महत्वाचा वाटा होता.