किंगफिशर अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा सीईओ टीम कुक यांनी २०१७ या आर्थिक वर्षामध्ये तब्बल ७४ टक्के इतका जास्त बोनस मिळाला आहे. आयफोन बनवणाऱ्या अॅपल या कंपनीने उत्पन्न व निव्वळ नफा या दोन्ही गोष्टींमध्ये चांगली कामगिरी केली असून त्याचे प्रतिबिंब या बोनसमध्ये उमटले आहे.

कुक यांना निव्वळ पगार आणि बोनस असं दोन्ही मिळून एकूण वार्षिक मानधन १०२ दशलक्ष डॉलर्स किंवा ६५४ कोटी रुपये इतके मिळाले आहे. कुक यांच्यासह अन्य उच्चपदस्थांनाही अशीच भरभक्कम वाढ मिळाली आहे. या मानधनामध्ये इक्विटीचा म्हणजे कंपनीच्या समभागाचा समावेश आहे. कंपनीने एस अँड पूर ५०० या निर्देशांकामध्ये असलेल्या अन्य स्पर्धक कंपन्यांपेक्षा चांगली कामगिरी केली तर अॅपलच्या अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ होते. गेल्या अनेक वर्षांचा अनुभव बघता, अॅपलची कामगिरी अन्य स्पर्धक कंपन्यांपेक्षा सरस होत आहे, आणि कंपनीचे अधिकारी जास्त मानधन घेत आहेत.

या आधी २०११ मध्येही कुक यांनी अशीच चमकदार कामगिरी केली होती. त्यावेळी अॅपलनं एस अँड पूर ५०० या निर्देशांकामधल्या दोन तृतीयांश कंपन्यांना मागे टाकले होते, त्यामुळे कुक यांना ५,६०,००० शेअर्स विशेष बक्षीस म्हणून देण्यात आले.

विशेष म्हणजे यंदा प्रथमच टीम कुक यांनी व्यावसायिक काम नसतानाही खासगी विमान भाड्यानं घेतलं आणि ९३ हजार डॉलर्सचं बिल अॅपलनं चुकवलं. त्यावेळी सुरक्षेचा विचार करता हे करणं योग्य होतं आणि हा खर्च कंपनीनं उचलायला हवा अशी बाजू कंपनीच्या व्यवस्थापनानं घेतली होती. त्यांच्या व्यक्तिगत सुरक्षेचा खर्च २.२४ लाख डॉलर्स इतका मोजण्यात आला होता.

अॅपलनी निव्वळ विक्री आणि उत्पन्नाची जी ध्येय ठेवली होती ती मागे टाकत विक्रमी कामगिरी केल्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या बोनसमध्येही त्याचे प्रतिबिंब उमटलेले दिसत आहे.