जगभरात गाजलेल्या मोगली चित्रपटातील ‘बगिरा‘ जवळपास सगळयांना माहिती आहे. या चित्रपटामध्ये मोगलीची बगिरासह इतर प्राण्यांसोबत घनिष्ठ मैत्री दाखविण्यात आली आहे. अशाच मैत्रीचा प्रत्यय देणारे फोटो गेल्या काही दिवसांमध्ये इंटरनेटवर व्हायरल होत आहे. छायाचित्रामध्ये एक चिमुकला जॅग्वारसोबत खेळताना दिसत आहे. अनेकांनी हा फोटो फेक ठरवला. पण हा फोटो खरा आहे. जॅग्वारसोबत छायाचित्रामध्ये दिसत असलेल्या १२ वर्षीय चिमुकल्याचे नाव टियागो सिलवेइरा असे आहे.

ब्राझीलमध्ये जन्मलेल्या टियागोचे संपूर्ण बालपण हे बिबटया व चित्त्याप्रमाणे दिसणाऱ्या जॅग्वारसोबत गेले आहे. टियागोचे आई-वडिल हे जीवशास्त्रज्ञ आहेत. ब्राझीलच्या एका जॅग्वार संस्थेमध्ये ते दोघेही काम करतात. मासंभक्षक असलेला जॅग्वार हा कधीही माणसांवर हल्ला करत नाही, असे जीवशास्त्रज्ञ लियानार्डो सिलवेइरा यांनी सखोल संशोधन केल्यानंतर म्हटले आहे. यामुळे त्यांनी आपला मुलगा टियागोला जॅग्वारच्या सोबत वाढविले. जॅग्वार कधीही माणसांवर चाल करून येत नाहीत. त्यांना आपल्या भावना समजतात, अशी शिकवण टियागोच्या वडिलांनी त्याला लहानपणापासून दिली आहे.

१२३ एकरच्या भव्य जागेवर राहणाऱ्या टियागोच्या कुटुंबाचे वास्तव्य अनेक जॅग्वारसोबत आहे. याठिकाणी २००२ मध्ये त्यांनी जॅग्वार संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेत ४ बछड्यांसह १४ जॅग्वार आहेत. लहानपणापासून त्यांच्यामध्ये राहिल्याने टियागोची या प्राण्यांसोबत चांगली गट्टी जमली आहे. एकत्र खाण्यापिण्याबरोबर आंघोळ करत असल्याचे त्यांचे अनेक छायाचित्र आहेत. टियागो आता शिक्षणासाठी संस्थेपासून दूर गेला आहे. पण त्याला आपल्या मित्रांची खूप आठवण येत असते. टियागो आणि जॅग्वारमध्ये मैत्रीची अनोखी भावना तयार झालेली आहे. त्यांच्या छायाचित्रांकडे पाहिले की मोगली चित्रपटातील बगिरासोबतच्या दोस्तीचे दृश्य आपोआपच डोळयासमोर येतात.