२४ सप्टेंबर २००७, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुलनेत नव्याने जन्माला आलेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान ही दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी समोरासमोर आले होते. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या मैदानावर पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल-हक मैदानावर तळ ठोकून भारताचा विजयाचा घास हिरावण्याच्या तयारीत होता. अखेरच्या षटकात विजयासाठी अवघ्या ६ धावांची गरज असताना मिसबाहने जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर यष्टींमागे फटका खेळण्याचा प्रयत्न केला, आणि श्रीशांतच्या हातात चेंडू जाऊन बसल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच जल्लोष झाला. भारताच्या पहिल्या टी-२० विश्वचषकाला आज १२ वर्ष पूर्ण झाली आहेत.

बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या सामन्यातील अखेरच्या षटकाचा एक व्हिडीओ टाकत, जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. भारतीय क्रिकेटप्रेमींनीही या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रीया नोंदवल्या आहेत.

जोगिंदर शर्मा, गौतम गंभीर यासारख्या खेळाडूंनीही या ऐतिहासीक क्षणावर आपली प्रतिक्रीया दिली आहे.

पहिल्या विजयानंतर भारतीय संघ पुन्हा कधीच टी-२० विश्वचषक जिंकू शकला नव्हता. २०२० साली ऑस्ट्रेलियामध्ये आगामी टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे.