सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता बरीच वर्ष उलटली आहेत. आपल्या २० वर्षांपेक्षा जास्त कारकिर्दीत सचिनने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. अशाच एका विक्रमाला आज दहा वर्ष पूर्ण होत आहेत. दहा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमधल्या पहिल्या द्विशतकाची नोंद केली होती.

ग्वालियरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात सचिनने आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई करताना नाबाद २०० धावा पटकावल्या होत्या. तब्बल ३९ वर्ष आणि २ हजार ९६२ वन-डे सामन्यांनंतर, आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमधलं पहिलं द्विशतक झळकावलं गेलं होतं. यानंतर सचिनचा हा विक्रम अनेक खेळाडूंनी मोडला खरा. मात्र ग्वालियरच्या मैदानावर सचिनने केलेली खेळी खास होती.

१४७ चेंडूत सचिनने २५ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद २०० धावा केल्या. त्याला दिनेश कार्तिकने ७९ तर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाबाद ६८ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. भारताने या सामन्यात आफ्रिकेला विजयासाठी ४०२ धावांचं आव्हान दिलं होतं. प्रत्युत्तरादाखल आफ्रिकेकडून एबी डिव्हीलियर्सनेही ११४ धावांची नाबाद शतकी खेळी केली. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. या सामन्यात भारताकडून श्रीशांतने ३, तर नेहरा-जाडेजा आणि युसूफ पठाण या त्रिकुटाने प्रत्येकी २-२ बळी घेतले होते. प्रवीण कुमारने एक बळी घेतला.