घरात बसून मोबाईलवरून तुम्ही टॅक्सी बूक कराल आणि काही मिनिटांमध्ये टॅक्सी दारात उभी असेल असा विचार तुम्ही दहा वर्षांपूर्वी नक्कीच केला नसेल. पण आज खरोखरच काही क्लिकवर टॅक्सी दारात उभी असते. ठरवलेल्या पैश्यांमध्ये ठरवलेल्या वेळेत ती तुम्हाला ठरवलेल्या ठिकाणी ड्रॉप करते.

मात्र कधीकधी या सिस्टीमध्ये गोंधळ होतो. कधी अधिकचे पैसे दाखवणे तर कधी कुठेतरी भलतीकडेच लोकेशन दाखवणे. चालक आलेली रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करण्यात घाई करतात हे यामागील कारण असल्याचे बोलले जाते. तर तांत्रिक बिघाड, बॅकएण्डला असलेल्या गोंधळामुळे अशा चुका घडतात. त्यामुळे निश्चित स्थळाऐवजी टॅक्सीचे लोकेशन भलतीकडेच दाखवले जाते. अनेकदा नकाशात ते अशा जागी असते जिथे टॅक्सी पोहचू शकत नाही. असंच काहीसं झालं आहे मुंबईमधील एका उबर युझरबरोबर. त्याने हा स्क्रीनशॉर्ट फेसबुकवर शेअर केला असून त्यावर नेटकऱ्यांची सध्या धम्माल चर्चा सुरु आहे.

मुंबईमधील हुसैन शेख याने १५ फेब्रुवारी रोजी शेअर केलेला उबेर बुकिंगचा स्क्रीन शॉर्ट सध्या फेसबुकवर व्हायरल झाला आहे. या स्क्रीन शॉर्टमध्ये अस्लम हा मारुती सुझूकी वॅगनआर गाडी घेऊन चक्क अरबी समुद्रात मुंबईच्या किनाऱ्यापासून अनेक किलोमीटर आतमध्ये असल्याचे दिसत आहे. नाकाशावरील उबेर कॅबची ही जगावेगळी लोकेशन हुसैनने फेसबुकवर शेअर करत त्याला ‘अस्लम भाई सबमरीन से आरैले हैं’ अशी टिपीकल मुंबईय्या भाषेतील कॅप्शन दिली आहे. त्यामुळे हा मजेदार स्क्रीनशॉर्ट चांगलाच व्हायरल झाला आहे. एका आठवड्यात हा स्क्रीनशॉर्ट पाच हजार ८५० हून अधिक फेसबुक युझर्सने शेअर केला आहे.