बलात्कारपीडितेला कुठेच न्याय मिळत नाही का? तिचा संघर्ष आत्महत्येवरच का संपतो? असा प्रश्न एका बलात्कारपीडितेने समाजाला विचारला होता. हा फक्त प्रश्न नक्कीच नव्हता हे समाजातलं कटू सत्य असून ते कोणीही नाकारू शकत नाही. आज अशा हजारो असतील ज्या न्याय न मिळाल्याने आत्महत्येचा पर्याय स्विकारतात. ऑस्ट्रेलियामध्ये राहणा-या १५ वर्षाच्या विद्यार्थीनीने देखील आत्महत्या करून आपला संघर्ष संपवला. पण जाता जाता आपल्या शाळेच्या मैत्रिणींना तिने पत्र लिहिले होते, या जगात जरी तिला कुठेच न्याय मिळाला नाही. पण आपल्या मैत्रिणींसोबत अशी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी तिने शेवटंच पत्र त्यांना लिहिले. हेच पत्र पुढे तिच्या आईने पूर्ण केलं. आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी सोशल मीडियावर तिची आई मोहिम राबवत आहे.

वाचा : भारताला अंतराळात नेणाऱ्या महिला

ऑस्ट्रेलियातील एका शाळेत शिकणा-या मुलीवर १३ वर्षांची असताना काही विद्यार्थ्यांनी बलात्कार केला होता. पण आरोपीही अल्पवयीन असल्याने त्यांना शिक्षा झाली नाही. या घटनेतून ती दोन वर्ष सावरलीच नाही. हे आरोपी तरीही शाळेत शिकत होते. या सा-याचा त्रास तिला इतका झाला की शेवटी तिने आत्महत्या करण्याचा पर्याय स्विकारला. पण जाता जाता तिने आपल्या शाळेच्या इतर मित्रमैत्रिणींना एक पत्र लिहिले होते. ‘माझ्यावर बलात्कार करणारे आज मोकाट आहेत. ते याच शाळेत शिकत आहे. पण त्यांना काहीच शिक्षा होऊ शकत नाही आज माझ्यावर बलात्कार केला. उद्या तुमच्यावरही करतील किंवा तसा प्रयत्न करतील तेव्हा तुम्ही सावध राहा अशी सुसाईट नोट तिच्याजवळ सापडली होती.

वाचा :  बलात्कारपीडितेशी लग्न करत तरूणाचा आरोपींविरोधात लढा

जिला नऊ महिने पोटात वाढवलं तिला असं मरताना पाहून एका आईला किती दु:ख होऊ शकते हे एका आईलाच समजू शकते त्यामुळे आपल्या मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तिच्यासाठी लढत राहण्याचे तिच्या आईने ठरवले आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या आईने एक पोस्ट शेअर केली होती. ‘गेले दोन वर्ष माझी मुलगी मानसिक त्रासातून जात आहे. भिती, तो अत्याचार तिची झोप उडवायचा. कित्येक रात्र तिला मी रडताना, आक्रोश करताना पाहिलं आहे. तुम्ही माझ्या मुलीला त्रास दिला आहे, मी तुम्हाला माफ करेनही पण तुम्ही स्वत:ला कधीच माफ करु शकत नाही कारण तिच्या रक्ताने तुमचे हात माखले आहेत.’ असं पत्रं तिच्या आईने लिहिले. सध्या तिच्या आईने एक फेसबुक पेज सुरू केलं आहे. आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी ही आई धडपडत आहे. तिला न्याय मिळावा यासाठी लाखो लोक या आईच्या म्हणजेच लिंडा ट्रिव्हेनच्या मागे उभे आहेत.