आजकालच्या रिमेक गाण्यांच्या जमान्यात जुनी गाणी मूळ स्वरुपात ऐकायला मिळाली तर कान आणि मन दोन्ही तृप्त झाल्यासारखं अनेकांना वाटत असेल. त्यातही गानकोकीळा लता मंगेशकर यांची गाणी अनेकांच्याच ‘ऑल टाइम फेव्हरेट’ लिस्टमधील असतील. १९७२ साली प्रदर्शित झालेल्या ‘शोर’ या चित्रपटातील ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं आजही कित्येकांच्या तोंडी असेल. हेच गाणं गुणगुणतानाचा एका गरीब महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे.

पश्चिम बंगाल इथल्या राणाघाट स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर बसलेली ही महिला लतादीदींचं गाणं मनापासून गात असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या उद्घोषणा आणि येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेनच्या आवाजातही या महिलेचं गाणं श्रवणयंत्रांना तृप्त करतं. या व्हिडीओला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून ४६ हजारांहून अधिक लोकांनी तो शेअर केला आहे.

या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये अनेकांनी त्या महिलेच्या गोड आवाजाची प्रशंसा केली आहे.