एकिकडे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आणि जगाला धक्काच बसला. पण पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीने जी बातमी दिली आहे ते ऐकून तर अनेकांना देखील धक्का बसेल. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकी नागरिक नसून ते मुळचे पाकिस्तानी आहेत असा दावा या वृत्तवाहिनीने केला आहे.

या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमाची व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली आहे आणि त्यावर अत्यंत विनोदी प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.  ट्रम्प यांच्या विजयानंतर त्यांची विस्तृत माहिती सांगणारा काही मिनिटांचा  माहितीपट या वृत्त वाहिनीने बनवला होता. पाकिस्तान ते अमेरिकेचा राष्ट्राध्य होण्याच्या ट्रम्प यांच्या प्रवासाचे वर्णन यात केले आहे. डोनाल्ड यांचे मुळ नाव दाऊद इब्राहम खान असून, पाकिस्तानमधल्या वझिरिस्तानमध्ये १९५४ मध्ये त्यांचा जन्म झाला असा दावा या चॅनलने केला आहे. ट्रम्प म्हणजेच दाऊद यांच्या पालकांचे अपघातात निधन झाले आणि त्यानंतर ब्रिटीश इंडियन सैन्यातील एका कँप्टनने त्यांना लंडनमध्ये नेले. ट्रम्प कुटुंबियांनी त्यांना दत्तक घेतले असून १९५५ पासून ते अमेरिकेत राहत असल्याचे या चॅनेलने म्हटले आहे. तसेच या वृत्तवाहिनींने ट्रम्प यांच्या लहानपणीचा एक फोटो देखील प्रसिद्ध केला आहे. पाकिस्तानच्या निओ टीव्हीने हा जावाईशोध लावला आहे. आतापर्यंत या क्लिपवर अनेक विनोदी प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. ऑक्टोबर महिन्यात युट्यूबवर हा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला.