२९ सप्टेंबरला भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्याची घोषणा केली. भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांना कंठस्नान घातले गेले. उरीमधील हल्ल्याची जखम संपूर्ण देशवासियांच्या उरात ताजी असताना भारतीय लष्कराने या हल्ल्याचा बदला घेतला. मात्र भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या या ऑपरेशनला पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी बोगस ठरवून टाकले आहे. भारतीय सरकारकडून भारतीयांना मूर्ख बनवत असल्याचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

भारतीय सैन्याचा सर्जिकल हल्ल्याचा दावा हा केवळ सोंग असल्याचे पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने सर्जिकल स्ट्राईकचे वृत्त देणाऱ्या भारतीय आणि पाकिस्तानी वृत्तपत्रांचे एक छायाचित्र शेअर केले आहे. यामध्ये दोन्ही देशांच्या वृत्तपत्रांनी एकच बातमी दोन वेगवेगळ्या पद्धतींनी दिल्याचे दिसून येते आहे.

भारतातील लोकांना मूर्ख बनवण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकची कथा रचण्यात आल्याचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. पाकिस्तानी सैन्याने भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर ८ भारतीय सैनिकांना मारल्याचा आणि एकाला कैद केल्याचा दावा केला होता. मात्र पाकिस्तानचा हा दावा भारताने फेटाळून लावला आहे. ‘भारताला सर्जिकल स्ट्राईकची गोष्ट विकण्यात अपयश आले’, असे पाकिस्तानी वृत्तपत्र द नेशनने म्हटलेले आहे. तर द ट्रिब्यूनने भारताच्या दाव्याचा उल्लेख सोंग म्हणून केला आहे.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री यांनी ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. ‘भारताने बुधवारी रात्री नियंत्रण रेषा ओलांडून गोळीबार केला. भारताच्या या गोळीबाराला पाकिस्तानी सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या हवाई दलाने भारताने कोणत्याही दहशतवादी तळांवर हल्ले केलेले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र या विधानाचा अर्थ पाकिस्तानात दहशतवादी तळ आहेत. मात्र ते भारताने उद्ध्वस्त केले नाहीत, असा होतो, हे बहुधा पाकिस्तानच्या लक्षात आलेले नाही.