महाविद्यालयात प्रवेश घेताना त्या महाविद्यालयाचा कट ऑफ हा सर्वात महत्त्वाचा विषय असतो. त्यावरुनच आपल्याला त्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार की नाही याबाबत शिक्कामोर्तब होत असतो. यातही मुलींचा टक्का अधिक का मुलांचा यावर चर्चा रंगताना दिसतात. पण जपानमधील एका विद्यापीठात चक्क मुलींपेक्षा मुलांना कमी कट ऑफ दिला गेला आहे. आता मुला-मुलींमध्ये असा भेद का? तर या विद्यापीठाने त्यामागचे कारणही स्पष्ट केले आहे. महिला पुरुषांपेक्षा मानसिकरित्या लवकर समजदार होतात असे त्यांनी म्हटले आहे. टोकीयोमध्ये असणाऱ्या जुनतेनदो वैद्यकीय विद्यापीठात अशाप्रकारे प्रवेश देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती विद्यापीठाने एका पत्रकार परिषदेद्वारे दिली.

जपानमध्ये एकूण डॉक्टरांपैकी केवळ २१ टक्के महिला डॉक्टर आहेत. जपानमधील आरोग्य मंत्रालयाने २०१६ मध्ये याबाबतची माहिती दिली होती. मात्र ही महिला डॉक्टरांची संख्या ३६ देशांमधील महिला डॉक्टरांमध्ये सर्वात कमी आहेत. विद्यापीठाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत विद्यापीठाचे कुलगुरु हिरोयुकी दाईदा म्हणाले, प्रवेशासाठी आलेल्या मुलींनी मुलाखतीमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली, त्यामुळे मुलांसाठी हा निर्णय काहीसा राग आणणारा होता. या विचित्र धोरणामुळे २०१७ आणि २०१८ मध्ये १६५ या परिक्षेत नापास झाल्याचे विद्यापीठाने सांगितले. अशाप्रकारे मुलींपेक्षा मुलांना कमी कट-ऑफ असणारे कदाचित देशातील हे पहिलेच विद्यापीठ असेल.