घरात शौचालय बांधण्यासाठी कानपूरमधील एक महिलेने आपले मंगळसूत्र विकले आहे. भारत सरकारकडून स्वच्छतेचे महत्त्व सगळ्यांना समजावून सांगण्यासाठी वेगवेगळ्या मोहिम राबवल्या जात आहेत. याच स्वच्छतेचे महत्त्व जाणून कानपूर मधल्या लता देवी दिवाकार यांनी आपल्या घरात देखील शौचालय बांधण्याचे ठरवले.
त्यांच्या घरात शौचालय नव्हते त्यामुळे घरातील महिला वर्गाला अनेक समस्यांना समोर जावे लागायचे. हे शौचालय बांधण्यासाठीही पैसे अपूरे पडत असल्याने अखेर लता देवी यांनी आपले मंगळसूत्र विकले आणि त्यातून आलेल्या पैशातून घरात शौचलय बांधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानामुळे आपल्याला ही प्रेरणा मिळाल्याचे तिने एएनआय या वृत्त वाहिनीला सांगितले. दागिन्यांपेक्षा शौचालयाची गरज कुटुंबाला अधिक होती म्हणूच मी ते विकल्याचे लता देवी यांनी सांगितले. सोशल मीडियावर देखील लता देवी यांचे खूपच कौतुक होत आहे. स्वच्छ भारत योजनेअंर्तगत प्रत्येक कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी ४ हजार रुपये दिले जातात पण आपल्याला मात्र अशा प्रकराची कोणतीही मदत मिळाली नसल्याचे लता देवी यांनी सांगितले.