वृद्धापकाळात आई वडिलांना आपल्या मुलांचाच आधार असतो. पण सगळेच नशीबवान नसतात. काही कमनशीबी वृद्ध आई वडिल असतात ज्यांची मुलं आपल्या पालकांची जबाबदारी नाकारतात. वृद्धापकाळात त्यांना सोडून देतात किंवा वृद्धाश्रमात तरी नेऊन सोडतात. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जाल तरी अनेक ठिकाणी तुम्हाला हिच परिस्थिती दिसेल. वृद्धापकाळात आपल्या वृद्ध आई- वडिलांची जबाबदारी नाकारणा-या मुलांची खोड मोडण्यासाठी चीनमधल्या एका गावाने अजब शक्कल लढवली आहे. जी मुलं आपल्या वृद्ध पालकांची जबाबदारी नाकारतात त्यांचा सार्वजनिकरित्या अपमान करण्यात येतो.

चीनमध्ये हुआँगफेंग नावाचे छोटे गाव आहे. या गावातील जो कोणी आपल्या वृद्ध आई वडिलांची जबाबदारी नाकारतो किंवा त्यांना हीन दर्जाची वागणूक देतो त्या सगळ्यांची नावे गावाच्या चौकाचौकात सार्वजनिक फलकावर लावण्यात येतात. चीनमध्ये वृद्धांची संख्या अधिक आहे. त्याचप्रमाणे वाढती लोकसंख्या, मंदावलेली अर्थव्यवस्था परिणामी बेरोजगारी यामुळे अनेक जण आपल्या वृद्ध पालकांची जबाबादारी टाळतात. जेव्हा गावातील एका वयोवृद्ध माणसाने हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा गावातील प्रमुखाने हा उपाय शोधून काढला. म्हाता-या आई वडिलांची जबाबादारी नाकारणे ही चीनमधली मोठी समस्या होत आहे. हजारो वृद्ध आई वडिलांनी यासाठी न्यायालयात देखील धाव घेतली आहे.

हुआँगफेंग या गावातील प्रमुखाने राबवलेल्या निर्णयाचे सगळ्यांकडून स्वागत केले जात आहे. जी मुले आपल्या आई वडिलांची जबाबदारी टाळतात त्याचे नाव, पत्ता इतर माहिती तसेच त्यांचे फोटो देखील चौकाचौकात लावण्यात येतात. त्यामुळे बदनामीला घाबरून का होईना पण या गावातील मुलं आपल्या आई- वडिलांना वा-यावर सोडत नाही. अधिक कडक उपाय म्हणून आता वृद्ध आई वडिलांना छळणा-या मुलांची नावे लाऊड स्पीकरवरून जाहिर करण्याचा निर्णयही या गावाने घेतला आहे.