अनेक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा असतो असं म्हणतात. म्हणजेच एकच गोष्ट दोन वेगवेगळ्या पद्धतीने पाहिल्यास तिच्यामधून वेगळा अर्थ निघू शकतो. अनेकदा एखाद्या गोष्टीकडे पाहताना दिसतं तसं नसतं याचा प्रत्यय येतो. अनेकदा या ऑप्टीकल इल्यूजनमुळे (म्हणजेच दृष्टीचा होणार भ्रम) गोंधळ उडतो. सध्या इंटरनेटवर अशाच एका फोटोची चर्चा आहे. ‘हा फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाइट आहे की रंगीत?’ यावरुन ही चर्चा रंगली आहे. अनेकांनी हा फोटो रंगीत असल्याचे म्हटले आहे तर बऱ्याच जणांनी हा फोटो ब्लॅक अँड व्हाइट असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

लिओनल पेज या अर्थतज्ज्ञाने ट्विट केलेल्या फोटोवर जवळजवळ पाचशे लोकांनी कमेंट करुन आपले मत नोंदवले आहे. १८ हजारहून अधिक जणांनी हा फोटो रिट्विट केला असून ३८ हजारहून अधिक जणांनी हा फोटो मागील पाच दिवसांमध्ये लाइक केला आहे. मुळात फोटो शेअर करतानाच पेज यांनी हा फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाइट असून त्यावर केवळ रंगीत बॉक्स काढले असल्याचे म्हटलं आहे. ‘हा ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो आहे. यावरील रेषा रंगीत आहेत. तुम्ही जे पाहता तेच मेंदूला खरं वाटतं,’ असं पेज यांनी हा फोटो शेअर करताना म्हटलं आहे.

या फोटो खाली नेटकऱ्यांची चांगलीच चर्चा रंगील असून अनेकांनी हा फोटो खरचं भन्नाट असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी हा फोटो रंगीतच असल्याचे मत मांडत खूप सारं फोटोशॉप करुन एकाच वेळी हा फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाइट आणि रंगीत असल्याचे भासवलं जात आहे असं म्हटलं आहे.