प्रसिद्ध अशा व्हॉट्स अॅप या मेसेंजिंग अॅपने आता ग्राहकांना मोफत व्हिडिओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. व्हॉट्स अॅप वापरणा-यांची संख्या ही सर्वाधिक आहे त्यामुळे त्यामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा देणा-या व्हॉट्स अॅपने मोफत व्हिडिओ कॉलिंगची सुविधाही दिली आहे. याच आठवड्यात १५ नोव्हेंबरला व्हॉट्स अॅपने या नव्या फिचरची घोषणा केली. व्हॉट्स अॅपवर हे फिचर येऊन दोन दिवस उलटत नाही तोच ग्राहकांना एका वेगळ्याच समस्येला समोरे जावे लागत आहे.

व्हॉट्स अॅपवर ग्राहकांना व्हिडिओ कॉलिंगचे निमंत्रण येत आहे. याबद्दल फारशी माहिती नसलेल्याने ग्राहकांनी या लिंकवर क्लिक देखील केले पण ही लिंक स्पॅम असून त्याद्वारे युजर्सची खासगी माहिती हॅक होण्याची शक्यता जास्त आहे. ‘You’re invited to try WhatsApp Video Calling feature. Only people with the invitation can enable this feature’ अशा प्रकारचा संदेश असलेली लिंक अनेक युजर्सना व्हॉट्स अॅपवर येत आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आणखी एक लिंक सुरु होते. त्यानंतर युजर्सला त्यांच्या चार मित्र मैत्रिणींना ही लिंक पाठवण्याचा संदेश जातो. पण हा संदेश स्पॅम असून यावर क्लिक केल्यास माहिती हॅक होण्याची शक्यता अधिक आहे, त्यामुळे व्हॉट्स अॅप कडून सुरक्षेच्या कारणासाठी हा संदेश दुर्लक्षित करण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या सेवेचा लाभ घेण्यासाठी अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी नवीन अपडेट गुगल प्ले वरुन किंवा अॅपल स्टोअरमधून डाऊनलोड करण्यास ग्राहकांना व्हॉट्स अॅपकडून सांगण्यात आले आहे.