उंचच उंच कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर घोंगावणाऱ्या माश्या, आजूबाजूला कुसलेले पदार्थ असह्य दुर्गंधी अशा जागेत उभं राहून खाण्यासाठी अन्न शोधणाऱ्या ११ वर्षांच्या मुलाचा काळीज पिळवटून काढणाऱ्या फोटो अनेकांनी पाहिला असेल. जगाच्या पाठीवर लोक कसे जगत असतील याचं भयावह वास्तव या फोटोनं जगापुढे आणलं आहे. हा फोटो आहे अयुब मोहम्मद रझिक या येमेनमध्ये राहणाऱ्या मुलाचा. येमेनमध्ये सध्या युद्धजन्यपरिस्थिती आहे. आधीच कामालीची गरिबी असणाऱ्या या देशात युद्धामुळे दोनवेळच्या जेवणाचीही अबाळ निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी अयुब त्याच्या शहरात असणाऱ्या डम्पिंग ग्राऊडवर जातो.

(छाया सौजन्य : रॉयटर्स)

अयुब आणि त्याचं कुटुंब होडिडा शहरात राहतं. येमेनमधलं हे चौथं मोठं शहर आहे. या परिसरात शहरातला कचरा आणून टाकला जातो. अयुब आणि त्याच्यासारखी शेकडो मुलं सकाळी कचऱ्याची गाडी आल्यावर धावत डम्पिंग ग्राऊंडवर जातात आणि तिथल्या कचऱ्यात टाकण्यात आलेली अर्धवट सडलेल्या भाज्या, मांस, ट्रेटा पॅकेट्स घेऊन घरी येतात. याच सडलेल्या आणि कचऱ्यात टाकलेल्या पदार्थापासून अयुबच्या घरात एकवेळ पुरेल असं जेवण बनतं. अयुबच्या कुटुंबात १८ जण राहतात. कधी कधी कचऱ्याच्या डब्यात रिकाम्या तेलाच्या बाटल्याही असतात त्यात तेलाचा अगदी एक थेंब जरी मिळाला तरी अयुब खुश होतो. तेच तेल कधीतरी तो डोक्यालाही लावतो. मला कचऱ्याच्या ढिगाऱ्यामधून रोज सडलेलं मांस, फळे, भाज्या मिळतात आणि त्यापासून आम्ही जेवण तयार करतो असं अयुबनं रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. येमेनमधल्या अनेक भागांत सध्या हिच परिस्थिती आहे. इथल्या युद्धाचा फटका हजारो कुटुबांना बसत आहेत.

येमेनचा संघर्ष हा मुख्यत: शिया इराण आणि सुन्नी सौदी अरेबिया यांच्या दरम्यानचा आहे. पश्चिम आशियाई राज्यव्यवस्थेवर आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी सौदी अरेबियाचा प्रयत्न आहे, तर या क्षेत्रात आपला दबाव निर्माण करण्याचा इराणचा प्रयत्न आहे. येमेनचा इराणला पाठिंबा आहे. येमेनमध्ये हौथी वर्चस्व निर्माण झाले तर ते सौदी अरेबियाच्या राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक होईल म्हणूनच सौदी अरेबियाने पुढाकार घेऊन सुन्नी अरब राष्ट्रांना एकत्रित आणून येमेनवर हल्ले करायला सुरुवात केली आहे आणि या हल्ल्यात आतापर्यंत १० हजार लोक मारले गेल्याचं समोर आलं आहे.