पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात होती. सोमवारी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दोन दिवसांत निर्णय घेण्याची सूचना केली होती. त्याआधीच पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षा रद्द झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जल्लोष केला. अनेक राजकारण्यांनी या निर्णयाला पाठिंबा देत आनंद व्यक्त केला. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी या निर्णयावरुन आनंद व्यक्त केला. तर काही विद्यार्थी येणाऱ्या निकालावरुन नाराज असल्याचे दिसून आले.

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा सर्वांत जास्त आनंद हा शेवटच्या बाकावरील विद्यार्थ्यांना झाला आहे असे फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटेने म्हटले आहे. आनंदाच्या भरात या विद्यार्थ्यांनी मिठाई मागवली असे झोमॅटोकडून सांगण्यात येत आहे. परीक्षा रद्द झाल्याच्या निर्णयानंतर एका तासात तब्बल मिठाईच्या १४ हजार १२४ ऑर्डर आल्याचे झोमॅटोने म्हटले आहे.

झोमॅटोने यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. “गेल्या एका तासात १२वीच्या बॅक-बेंचर्सकडून १४,१२४ मिठाईच्या ऑर्डर आल्या आहेत असे गृहीत धरत आहोत,” असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या ट्विटवर एका युजरने उत्तर देत झोमॅटोची खिल्ली उडवली आहे. ते सर्व विद्यार्थी झोमॅटोमध्ये काम करणार आहेत असे या युजरने म्हटले आहे. “ते लवकरच झोमॅटोत चालक म्हणून काम करत असतील” असे म्हणत युजरने झोमॅटोची खिल्ली उडवली आहे.