पेरुमध्ये तीन बोट असलेली ममी सापडली असून कदाचित हा एलिअनचा सांगाडा नसून माणसाचीच एखादी प्रजाती असावी असा दावा संशोधकांनी केला आहे. पेरुमधील नाझ्कामध्ये हे अवशेष सापडले असून ही ममी कदाचित १ हजार ८०० वर्षे जुनी असावी असं म्हटलं जात आहे.

ब्रिटिश संशोधक आणि माहितीपट निर्माते स्टीव्ह मेरा यांनी काही पुरावे डिएनए तपासणीसाठी पाठवले आहेत. कदाचित यातून एखादी नवी माहिती हाती येईल आणि मानवी उत्पत्तीचा इतिहास पूर्णपणे बदलेल असा दावा स्टीव्ह यांनी केला आहे. हा एका महिलेचा सांगडा असून तिला तूर्त ‘मारिया’ असं नाव देण्यात आलं आहे. मारियाच्या हाता पायांची उंची सामान्य मानवाच्या शरीररचनेपेक्षा थोडी मोठी आहे त्यामुळे कदाचित मानव आणि एलिअन यांच्यापासून तयार झालेली ही हायब्रीड प्रजाती असावी असाही दावा अनेकांनी केला आहे.

मात्र ही ममी एलिअनची नसून एका स्त्रिची असावी, असं ठाम मत स्टीव्ह यांचं आहे. २१ व्या शतकातील हा महत्त्वाचा शोध आहे. त्यामुळे मानवाच्या उत्पत्तीचा इतिहास नक्कीच बदलेल असा दावा स्टीव्ह यांनी केला आहे. मात्र UFO Investigations Manual चे लेखक निगेल व्हॉटसन यांनी स्टीव्ह यांचा दावा खोडून टाकला आहे. तीन बोटांच्या ममीचा शोध लावणं आणि या ममीला माणसाची नवी प्रजाती किंवा एलिअन म्हणून घोषीत करणं किती हास्यास्पद आहे, या गोष्टीत कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही असं निगेल यांनी म्हटलं आहे.